MNS leader Sameer Thigale (PC - Facebook)

MNS leader Sameer Thigale: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे (Samir Thigale) यांच्यावर शनिवारी रात्री राजगुरु नगर येथील त्यांच्या निवासस्थानी गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सुदैवाने या घटनेत थिगळे हे सुखरूप बचावले असून त्यांनी या संदर्भात राजगुरू नगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे यांच्यावर खुनाचा प्रयत्न आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी शोध सुरू करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपींपैकी एक रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो सध्या जामिनावर बाहेर आहे. शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास तो आणि त्याचा साथीदार राजगुरु नगर येथील सत्रकठल येथे थिगळे यांच्या घरात घुसले. (हेही वाचा -Moreshwar Temurde Passes Away: विधानसभेचे माजी उपाध्यक्ष, NCP नेते ॲड मोरेश्वर टेमुर्डे यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन; मरणोत्तर देहदानाचा निर्णय)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने या भागातील 'भाई' असल्याचे सांगून थिगळे यांच्याकडे पैशांची मागणी केली. एका आरोपीने मनसे नेत्याकडे बंदूक दाखवून ट्रिगर खेचला, पण बंदुकीतून गोळी सुटली नाही. त्यानंतर आरोपींनी हवेत गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला.

ही घटना घडली तेव्हा थिगळे यांचे कुटुंबीय उपस्थित होते. हा संपूर्ण थरार कुटुंबियांनी पाहिला. गोळीबाराच्या आवाजामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती. याप्रकरणी राजगुरुनगर पोलिस ठाण्यात मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला करत शस्त्राचा वापर करून खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून राजगुरूनगर पोलीस या गुंडांचा शोध घेत आहेत.