पुण्यातील (Pune City) गंगाधाम परिसरात असलेल्या एका गॅरेजला आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. क्षणार्धात या आगीचा भडका उडाल्याने संपूर्ण गॅरेजला आगीने विळखा घातला.  स्थानिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. यांनतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत तब्बल 17 चारचाकी वाहने जळून खाक झाली आहे. (हेही वाचा - Pune Fire News: पुण्यातील नऱ्हे परिसरात भीषण आग; 10 वाहने जळून खाक)

पाहा पोस्ट -

आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील गंगाधाम परिसरात आई माता मंदिराजवळ मोकळ्या जागेत एक प्रसिद्ध गॅरेज आहे. या गॅरेजमध्ये अनेकांची वाहने दुरुस्तीसाठी होती. अशावेळी आग लागल्याने या आगीत मोठे नुकसान झालेले पहायला मिळाले.  आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 4 बंब घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरीही 17 वाहने जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय गॅरेजमधील साहित्य देखील जळाल्याने गॅरेज मालकाचे मोठे नुकसान झाले. सध्या अग्निशमन दलाकडून ही आग का लागली या गोष्टीचा तपास हा केला जात आहे. या प्रकरणाची पोलिसांनी देखील दखल घेतली आहे.