Drugs | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

पुणे शहरात 2024 मध्ये अंमली पदार्थांची तस्करी आणि अंमली पदार्थ जप्त (Drug Trafficking and Narcotics Seizures) करण्याच्या प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे, मागील वर्षीच्या प्रकरणांनी मागील सर्व विक्रमांना मागे टाकले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 2024 मध्ये जप्त केलेल्या अंमली पदार्थांचे एकूण मूल्य तब्बल 3,679.36 कोटींवर पोहोचले आहे, जे 2023 मधील 13.61 कोटींवरून मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसते. महत्वाचे म्हणजे 2022 मध्ये 150 प्रकरणांमध्ये 9.9 कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता. या जप्तींच्या उच्च प्रमाणामुळे शहरात अवैध अंमली पदार्थ आणि अंमली पदार्थांच्या तस्करीच्या उपलब्धतेबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे.

माहितीनुसार, 2024 मध्ये, 191 पुरुष, 3 महिला आणि 10 परदेशी नागरिकांसह एकूण 204 व्यक्तींना पकडण्यात आले आहे, जे 2023 मध्ये केलेल्या 193 अटकांपेक्षा किंचित वाढले आहे, ज्यामध्ये 172 पुरुष, 12 महिला आणि 9 परदेशी नागरिकांचा समावेश होता.

मेफेड्रोन (MD) जप्तीच्या अनेक घटनांपैकी एका प्रकरणात, पुणे शहर पोलिसांनी कुरकुंभ येथील उत्पादन कारखाना आणि धानोरी आणि विश्रांतवाडी येथील दोन वेगवेगळ्या गोदामांवर छापे टाकून 3,677 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. पोलिसांनी इतर गुन्ह्यांमध्ये गांजा, कोकेन, एलएसडी, अफू आणि इतर अमली पदार्थ जप्त केले. नुकत्याच झालेल्या एका गुन्ह्यात, पोलिसांनी 15 जानेवारी 2025 रोजी येरवडा कार्यक्षेत्रातील लक्ष्मीनगर येथून 23.38 लाख किमतीचे मेफेड्रोन जप्त केले. आरोपीचे नाव अहमद वाजीद खान (45) रा. लक्ष्मीनगर, येरवडा येथे असून तो येरवडा येथे एमडी विकत होता.

त्याचप्रमाणे, दुसऱ्या प्रकरणात, दोन आरोपी, हुसेन नूर खान (21) आणि फैजान अयाज शेख (22, रा. कोंढवा) यांच्यावर लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 15.70 लाख किमतीच्या मेफेड्रोनची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा 16 जानेवारी 2025 रोजी उघडकीस आला. या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. अंमली पदार्थांशी संबंधित प्रकरणांमध्ये परदेशी सहभाग वाढल्याने वाढत्या धोक्याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन हायलाइट होते, तसेच हराच्या कायद्याची अंमलबजावणी आणि सीमा नियंत्रण उपायांच्या परिणामकारकतेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण होतात. (हेही वाचा: NCB Seizes Fake Drug Pills and Cigarettes: मुंबईमध्ये एनसीबीची मोठी कारवाई; आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त केले 74,000 अवैध कॅप्सूल, 2.4 लाख बनावट सिगारेट)

याबाबत फ्री प्रेस जर्नलशी बोलताना डीसीपी (गुन्हे), निखिल पिंगळे म्हणाले, ‘शहरातील अवैध अंमली पदार्थांचे धंदे बंद करण्यासाठी आमची टीम अत्यंत सक्रिय आणि सातत्याने अंमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेल्या लोकांवर कारवाई करत आहे. अंमली पदार्थांचे तस्कर प्रामुख्याने छत्तीसगड, ओडिशा आणि तेलंगणा इत्यादी राज्ये आणि इतर ठिकाणाहून चरस आणतात. मेफेड्रोनचे उत्पादन सोपे आहे कारण ते लहान जागेत तयार केले जाऊ शकते.’ ते पुढे म्हणाले, ‘परदेशी लोक शिक्षण घेण्याच्या बहाण्याने शहरात आले होते. त्यानंतर इथे ते अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांमध्ये सामील झाले. त्यांचा पासपोर्टचा कार्यकाळ संपल्यानंतरही ते शहरातच राहतात. काही वेळा त्यांना ओळखणे कठीण असते.’