Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

चीन मधील वुहान शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसचे जाळे आता जगभरात पसरले आहे. तर कोरोना व्हायरसचा भारतात सुद्धा शिरकाव झाला आहे. याच पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. हे रुग्ण दुबई येतून पुण्यात आले होते. त्यांच्यावर नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच कारणामुळे पुण्यात खबरदारीचा उपाय म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अन्य जणांना सुद्धा त्याची लक्षणे आढळून आली आहे. याचमुळे कोरोना व्हायरसचा आकडा 5 वर पोहचला आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना कोरोना व्हायरस बाधीत दोन रुग्ण पुण्यात सापडल्याच्या वृत्ताची पुष्टी केली होती. त्यानुसार दुबई येथून एक दापंत्य एका कॅबने आले. त्या कॅबचालकासह मुलगी आणि सहप्रवाशी यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती ठिक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोना व्हायरस बाधीत दोन रुग्ण आढळून असले तरी, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. मात्र, राज्य सरकार आणि आरोग्य विभागाने जारी केलेल्या अचारसंहितेचे पालन करावे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.(पुण्यात कोरोना व्हायरसचे आणखी 3 रुग्ण; शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाचवर पोहचली)

तसेच पुण्यातील सिंहगड परिसरातील 3 शाळा दोन-तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. नांदेड सिटी स्कूल आणि पवार पब्लिक स्कूल या दोन शाळा शनिवार पर्यंत बंद राहणार असून डिएसके शाळा दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. तर कोरोनाग्रस्त दांम्पत्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली असून नागरिकांनी घाबरुन न जाता दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. विशेष म्हणजे कोरोना व्हायरसच्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील IT कंपन्यांनी देखील कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'ची मूभा दिली आहे.