पुणे जिल्ह्यात रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवणा-या टँकरना रुग्णवाहिकांचा दर्जा देण्याचे आदेश; टँकरमध्येही असणार 'ही' विशेष सुविधा
Oxygen Cylinder (Photo Credits: (Wikimedia Commons)

महाराष्ट्रात कोरोना बाधितांची (COVID-19 Positive Cases) संख्या दिवसागणिक वाढत असून राज्यात सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. यामुळे रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या ऑक्सिजन पुरवणा-या टँकरना (Oxygen Tanker) रुग्णवाहिकाचा दर्जा देण्याचे आदेश पुणे जिल्हाधिका-यांनी दिले. त्यासोबतच या टँकरचे वैशिष्ट्य म्हणजे वैद्यकीय सुविधांना ऑक्सिजन पुरवणाऱ्या टँकरमध्ये आता रुग्णवाहिकेसारखे सायरन असतील, अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.

दरम्यान पुणे जिल्ह्यात मागील 24 तासांत कोरोनाचे 4717 नवे रुग्ण आढळले असून 90 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,20,692 वर पोहोचली असून मृतांचा आकडा 5,059 वर पोहोचला आहे. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत 1,74,627 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेने दिली आहे. Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 2,321 रुग्णांची नोंद; शहरामधील एकूण संख्या 1,67,608 वर

महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, मागील 24 तासांत राज्यात 22,084 नवे रुग्ण आढळले असून राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 10 लाख 37 हजार 765 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे राज्यात 13,489 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यामुळे राज्यात कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या आकडा 7 लाख 28 हजार 512 वर पोहोचला आहे. तर मुंबई शहरामध्ये काल 2,321 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण संक्रमितांची संख्या 1,67,608 वर पोहोचली आहे. मुंबईमध्ये कोरोनाचे 772 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण 1,30,016 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या शहरामध्ये कोरोना विषाणूच्या 29,131 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल मुंबईमध्ये 42 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 8,106 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बीएमसीने याबाबत माहिती दिली.