हातांसाठी सौम्य असणारा आणि हातांना कोरडे न करणारा पर्यावरण-स्नेही, दीर्घकाळ टिकणारा हँड सॅनिटायझर आता लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. पुणे-स्थित स्टार्ट-अपने चांदीच्या अतिसूक्ष्म कणांचा वापर करून हा अल्कोहोल विरहित, पाण्याचा समावेश असलेला, अ-ज्वलनशील आणि बिनविषारी हँड सॅनिटायझर विकसित केला आहे.
हँड सॅनिटायझरचा वारंवार वापर केल्यामुळे कोविड-19 महामारीच्या काळात अनेक लोकांना हात कोरडे पडण्याच्या समस्येला सतत तोंड द्यावे लागले आहे. ‘वुईइनोव्हेट-बायोसोल्युशन्स’ नामक या स्टार्ट-अप ने विकसित केलेला हँड सॅनिटायझर सूक्ष्मजीव विरोधी प्रक्रिया दीर्घकाळ सुरु ठेवतो. त्यामुळे तो पुनःपुन्हा लावण्याची गरज नसते. चांदीचे अतिसूक्ष्म कण संपर्कात येणाऱ्या सूक्ष्मजीवांचा नायनाट करण्यासाठी हळूहळू आणि सातत्याने चांदीच्या आयनांचा स्त्रोत सोडतात. हा सॅनिटायझर सर्वसामान्य वातावरणात साठवून ठेवता येतो.
या सॅनिटायझरने केंद्रीय औषध प्रमाणक नियंत्रण संस्थेने सॅनिटायझरसाठी मंजूर केलेली चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली असून उच्च प्रतीची विषाणूनाशक क्षमता दर्शविली आहे.
‘वुईइनोव्हेट-बायोसोल्युशन्स’ या संस्थेला केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्योजकता विकास मंडळाकडून (NSTEDB) ‘कवच 2020’ अनुदान मिळाले आहे आणि या संस्थेचे पुढील विकसन पुण्याच्या उद्योजकता विकास केंद्र (Venture Centre) येथे झाले आहे. त्यांनी कोलॉईडल चांदीच्या द्रावणावर आधारित हँड सॅनिटायझर विकसित केला आहे. विषाणूमधील विशिष्ट RNA धाग्याचे संश्लेषण आणि विषाणूचे अंकुरण थांबविण्याच्या चांदीच्या सूक्ष्मकणांच्या क्षमतेचा वापर करून घेण्यावर हे तंत्रज्ञान आधारलेले आहे.
“या सॅनिटायझरबाबतच्या अभ्यासाबद्दल आम्हाला पूर्ण खात्री असून आता आम्ही या हँड सॅनिटायझरच्या विशिष्ट औषधी सूत्राला भारताच्या केंद्रीय औषध प्रमाणक नियंत्रण संस्थेकडून परवाना दिला जाण्याची वाट पाहत आहोत. अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण संशोधन भारताला त्याच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाच्या दिशेने वेगाने प्रगती करण्यास मदत करेल आणि भविष्यात अशा महामारीला तोंड देण्यासाठी देशाला स्वत्व टिकवून ठेवण्यासाठी सक्षम करेल,” असे या संस्थेच्या सह-संस्थापक आणि मुख्य परिचालन अधिकारी डॉ.अनुपमा इंजिनियर यांनी सांगितले.
चांदीचे अतिसूक्ष्म कण अत्यंत परिणामकारक विषाणूरोधक असल्याचे सिध्द झले आहे त्यामुळे हे कण एचआयव्ही, कावीळ, नागीण, फ्ल्यू आणि इतर अनेक प्राणघातक विषाणूंच्या विरोधात उपयुक्त ठरतात.
नुकत्याच हाती आलेल्या अहवालातून असे सुचविण्यात आले आहे की, चांदीच्या अतिसूक्ष्म कणांतील काही घटक कोरोना विषाणूमधील विशिष्ट RNA धाग्याचे संश्लेषण आणि विषाणूचे अंकुरण थांबविण्यात यशस्वी ठरतात. ज्या गुणधर्मावर ‘वुईइनोव्हेटबायोसोल्युशन्स’ या संस्थेच्या हँड सॅनिटायझरचे तंत्रज्ञान आधारित आहे ती कोलॉईडल चांदी कोरोना विषाणूच्या पृष्ठभागावरील ग्लायकोप्रोटिन्सना अवरोध निर्माण करून विषाणूची वाढ आणि संसर्गक्षमता यांना प्रतिबंध करते आणि ज्यामुळे कोविड-19 संसर्गाच्या प्रसाराला अटकाव करता येतो.
या हँड सॅनिटायझरची विविध प्रकारच्या विषाणूंविरोधातील कार्यक्षमता तपासण्यासाठीचा अभ्यास सध्या सुरु आहे.