पुणे: इंजिनिअर तरुणाची आत्महत्या; व्हॉट्सअॅपवर ठेवले होते स्टेटस 'मी दुसऱ्या जगात जात आहे'
Suicide | (Photo Credits: Pixabay)

वय वर्षे अवघे 24 असलेल्या एका अभियंता (Engineer) तरुणाने आत्महत्या केली आहे. ही घटना पुणे (Pune) जिल्ह्यातील मोशी (Moshi येथे घडली. या तरुणाने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन उडी घेतली आणि आपले जीवन संपवले. दरम्यान, हे कृत्य करण्यापूर्वी त्याने आपल्या मोबाईल वर व्हॉट्सअॅप स्टेटसही ठेवले होते. 'आई, बाबा आणि बहीणला सांभाळ मी दुसऱ्या जगात जात आहे' असा त्या स्टेटसचा आशय होता. अक्षय पोतदार (Akshay Potdar वय २४, रा. चिखली, साने चौक. मूळ गाव – वाई, सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

अक्षय पोतदार याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयने ज्या इमारतीतून उडी घेऊन आत्महत्या केली त्या इमारतीत तो किंवा त्याचे कुटुंबीय राहात नव्हते. अक्षयच्या आत्महत्येमुळे त्याचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार अशा सर्वांनाच धक्का बसला आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून तो साने चौक परिसरातच राहात होता. तो प्रदीर्घ काळ तो मूळ गावी गेला नव्हता. (हेही वाचा, Kannada Actor Susheel Gowda Passes Away: कन्नड अभिनेता सुशील गौडा याचे निधन; आत्महत्या केल्याचे वृत्त)

पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, बुधवारी दुपारी साधारण तीन वाजणेच्या सुमारास अक्षय हा मोशी येथील ‘वुड्स व्हिला’ फेज तीन सोसायटीत आला. त्याने व्यक्तिगत कारण देत सोसायटीच्या सुरक्षारक्षकाकडून टेरेसची चावी मागून घेतली. मात्र सुरक्षा रक्षकाने चावी देण्यास नकार दिला. त्यानंतर तो वाट पाहात काही काळ तेथेच थांबला. त्यानंतर दुसरा सुरक्षा रक्षक आल्यावर त्याने फ्लॅटमध्ये जायचे आहे असे कारण देत रजिस्टरमध्ये तशी नोंद केली. त्यानंतर तो इमारतीच्या 11 व्या मजल्यावर गेला आणि तेथून उडी घेऊन त्याने आत्महत्या केली. धक्कादायक असे की, त्याने ज्या फ्लॅटमध्ये जायचे आहे असे सांगून सोसायटीत प्रवेश मिळवला तो फ्लॅट गेली बरीच महिने बंद आहे. त्यामुळे या प्रकरणातील गुंता अधिकच वाढला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.