पुणे (Pune) शहरात एका पाठोपाठ एक खळबळजनक घटना घडत आहेत. यातच पुण्याच्या ससून रुग्णालयातून (Sassoon Hospital) धक्कादायक माहिती समोर आली आहे. नर्सच्या (Nurse) वेशातील एका महिलेने 3 महिन्यांच्या बाळाला पळवून नेल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली होती. यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले आहे. तसेच तिच्या तावडीतून चिमुकलीची सुटका करून तिला तिच्या आईकडे सोपवले आहे.
वंदना जेठे असे आरोपी महिलेचे नाव आहे. वंदना ही पुण्यातील खराडी येथे राहत असून उच्चशिक्षित आहे. परंतु, लग्नाला अनेक वर्ष उलटून गेली. पण अजूनही मुल होत नसल्याने वंदना रुग्णालयातून मुल पळवून नेण्याची योजना आखली. दरम्यान, कासेवाडी भागात राहणारी एक महिला तिच्या 3 महिन्याच्या मुलीसह काल (9 ऑगस्ट) दुपारी ससून रुग्णालयात आली होती. या महिलेसोबत तिची मैत्रीण आली होती. मात्र, काही वेळानंतर संबंधित महिलेची मैत्रीण कामानिमित्त बाहेर गेली. त्यानंतर आरोपी वंदना या महिलेकडे आली. तसेच तुम्हाला त्यांनी बाहेर बोलवले असून तुमच्या बाळाला मी संभाळते, असे वंदना त्या महिलेला म्हणाली. नर्सच्या वेशात असलेल्या वंदनाकडे त्या महिलेने विश्वासाने तिच्या मुलीला दिले. परंतु, आपले बाळ घेण्यासाठी आलेली महिलेला आरोपी वंदना कुठेच दिसली नाही. त्यानंतर रुग्णालयात एकच खळबळ माजली. हे देखील वाचा- Mumbai: व्हेल माशाची 5 कोटींहून अधिक रक्कम असलेल्या उलटीची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
वैद्यकीय प्रशासनाने या घटनेची माहिती तेथील सुरक्षारक्षक आणि पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. ज्यात आरोपी रुग्णालयाच्या बाहेरील एका रिक्षात मुलीला घेऊन बसताना दिसली. ज्या रिक्षात आरोपी महिला मुलीला घेऊन गेली, तो रिक्षावाला अन्य दुसऱ्या रिक्षावाल्याचा मित्र होता. या व्यक्तीने फोन लावून रिक्षा चालकाला थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर रिक्षाचालकाने आरोपी महिलेला बोलण्यात गुंतवून ठेवले आणि यानंतर आरोपी महिलेला चंदननगर येथून अथक प्रयत्नानंतर ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती लोकसत्ताने आपल्या वृत्तात दिली आहे.