नागपूर (Nagpur) मध्ये मुलाच्या अपहरणाचा प्रॅन्क व्हिडिओ शूट करणं 4 किशोरवयीन मुलांना महागात पडला आहे. त्यांच्या या कृतीमुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. हा प्रकार सोमवार सकाळचा आहे. यामध्ये 2 मुलं बारावीला आहेत तर दोन मुलं NEET exam ची तयारी करत होती. ही 4 मुलं अकरावीतील एका मुलाचं अपहरण करत होती. पोलिसांनी या मुलांना ताब्यात घेतले आणि नंतर समज देऊन त्यांना सोडलं. अशी माहिती प्रताप नगरच्या पोलिस स्टेशन मधील अधिकार्यांनी दिली आहे.
अपहरणाचा प्रयत्न केलेल्या मुलाचं नाव आदेश आहे. आदेश 17 वर्षांचा मुलगा चंद्रपूरचा आहे. सध्या तो नागपूर मध्ये मित्रांसोबत भाड्याने राहत होता. मागील वर्षभरापासून तो देखील जेईई परीक्षेचा अभ्यास करत होता. सोमवारी सकाळी 6.45 च्या सुमारास मित्र यश आणि वेदांत सोबत क्लासला जायला निघाला. इतक्यात त्यांच्या मागून एक पांढरी कार आली. या गाडीतून 3 जण उतरले. त्यांनी आदेशला जबरदस्तीने गाडीत बसायला सांगितलं.
दरम्यान आदेशच्या मित्रांनी हल्लागुल्ला केल्यानंतर त्यांनी गाडीत बसून पळ काढला. यानंतर आदेशने घडला प्रकार त्याच्या शिक्षकांना सांगितला. शिक्षकांनी त्याला पोलिसांकडे नेले आणि घडल्या प्रकाराची तक्रार नोंदवली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आयपीसी 363,511 आणि 34 चं कलम लावलं. या प्रकरणी तपास सुरू केला.
सीसीटीव्ही फूटेज पाहिल्यानंतर पोलिसांनी आरोपी सुशांत (18) याला ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांना सुशांतने दिलेल्या माहितीवरून त्याच्याच वयाच्या श्रेयस, यश आणि अर्णव यांना ताब्यात घेतलं. पोलिसांच्या चौकशीमध्ये त्या चौघांनी आपण सोशल मीडीयावर टाकण्यासाठी एक प्रॅन्क व्हिडिओ शूट करत होतो त्याचा हा भाग असल्याचं सांगितलं. पोलिसांनी नंतर त्यांच्या पालकांनाही पोलिस स्टेशन मध्ये बोलावलं. पालकही आपल्या पाल्यांच्या या कृतीने चकीत झाले. यामध्ये सुशांत कडे वाहन परवाना नसताना तो गाडी चालवत असल्याचं समोर आलं.
पालकांनी पोलिसांना विनवणी करून आणि भविष्यात असा प्रकार पुन्हा होणार नाही असं सांगताच त्यांची कठोर कारवाई पासून सुटका झाली. पोलिसांनी मुलांना सज्जड दम आणि वॉर्निंग नोटीस देत सोडले आहे.