पुण्यातील (Pune) प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सचे (Marathe Jewellers) माजी भागीदार प्रणव मराठेंना (Pranav Marathe) अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. गुंतवणूकदारांची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police) प्रणव मराठेंना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मराठे ज्वेलर्सच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे अमिष दाखवत प्रणव मराठे यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली. प्रणव मराठें यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अन्य चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठे ज्वेलर्समार्फत सोने, चांदी आणि मूळ रकमेवर जादा परतावा मिळेल असे आमिष नागरिकांना दाखवण्यात आले होते. यामुळे अनेक नागरिकांनी त्यांच्याकडे पैसे गुंतवले. परंतु, अनेक दिवस उलटून गेल्यानंतर पैसे परत मिळाले नसल्याने शुभांगी काटे (वय, 59) यांनी ज्वेलर्स व्यवस्थापनाकडे विचारणा केली. मात्र, त्यांनना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात न आल्याने त्यांनी कोथरूड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी प्रणव मराठेंना अटक केली आहे. तसेच कौस्तुभ अरविंद मराठे, मजिरी कौस्तुभ मराठे, नीना मिलिंद मराठे, मयत मिलिंद अरविंद मराठे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे देखील वाचा- Bank Fraud Case: बॅंक फसवणूकप्रकरणी माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल
आरोपींनी प्रणव ज्वेलर्सच्या विविध योजनांमध्ये रोख रक्कम, सोने, चांदी आदी गुंतवणूक करायला लावली होती. तसेच फिर्यादी शुभांगी यांच्यासह एकूण 18 गुंतवणूकदारांची 5 कोटी 9 लाख 72 हजार 970 रुपयांची फसवणूक केल्या असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात निर्दशनास आले आहे.
महत्वाचे म्हणजे, मिलिंद अरविंद मराठे यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांनी आर्थिक ताणतणावातून टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले होते. त्यांच्या आत्महत्येच्या बातमीने संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ माजली होती.