केंद्रामध्ये भाजप प्रणित एनडीए सरकारमध्ये (NDA Government) नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात (Narendra Modi Cabinet महाराष्ट्रातील सहा खासदारांना मंत्री (Portfolio of Union Ministers in Maharashtra) म्हणून संधी मिळाली आहे. यातील तिघे नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळातही मंत्री होते. तर इतर चौघांना प्रथमच संधी दिली जात आहे. त्यातही दोन मंत्री अगदीच तरुण आहेत आणि त्यातील एकाची तर लोकसभेची पहिलीच टर्म आहे. दुसरा मंत्री भाजपच्या मित्रपक्ष असलेल्या आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा खासदार आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (एनसीपी) केंद्रीय मंत्रीमंडलात शून्य स्थान मिळाले आहे. या पक्षाने प्रफुल्ल पटेल यांच्या मंत्रिमंडळात स्थान घेण्याऐवजी स्वतंत्र प्रभारासह राज्यमंत्रिपदाचा (MoS) भाजपचा प्रस्ताव नाकारला.
महाराष्ट्रातील मंत्र्यांची संख्या घटली
मागील मोदी सरकारमध्ये (2019-24), महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांच्या आठ मंत्र्यांनी केले होते. मात्र, सध्याच्या कारभारात ही संख्या सहा झाली आहे. भाजप खासदार नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांना कॅबिनेट मंत्रीपदी कायम ठेवण्यात आले आहे. याशिवाय, महाराष्ट्रातील भाजपच्या एकमेव महिला खासदार रक्षा खडसे आणि प्रथमच खासदार मुरलीधर मोहोळ यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपच्या मित्रपक्षांपैकी, आरपीआय प्रमुख रामदास आठवले यांना स्वतंत्र प्रभारासह राज्यमंत्री म्हणून कायम ठेवण्यात आले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनीही स्वतंत्र प्रभारासह राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. (हेही वाचा, Modi Cabinet List 2024 Ministers Portfolio: 4 मंत्र्याच्या खात्यांमध्ये कोणताही बदल नाही; नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाला मिळाले कोणते मंत्रिपद; पाहा संपूर्ण यादी)
महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री आणि त्यांची खाती
नितीन गडकरी - रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय
पियुष गोयल - वाणिज्य मंत्रालय
रक्षा खडसे - क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री
मुरलीधर मोहोळ - सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री
रामदास आठवले - सामाजिक न्याय राज्यमंत्री
प्रतापराव जाधव - आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री
राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिमंडळात स्थान नाही
राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांना त्यांच्या व्यापक अनुभवामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळावे अशी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची इच्छा होती. मात्र, ती इच्छा फलद्रूप होऊ शकली नाही. परिणामी राष्ट्रवादीने राज्यमंत्रीपदाची ऑफर नाकारली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीच्या फॉर्म्युल्यांचा आदर केला पाहिजे आणि भविष्यातील मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचा विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. फडणवीस यांनी सांगितले की, "आम्ही राष्ट्रवादीला स्वतंत्र प्रभारासह एक मंत्रिपद देऊ केले होते, परंतु प्रफुल्ल पटेल यांचे नाव कॅबिनेट मंत्री म्हणून निश्चित व्हावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या अनुभवामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना स्वतंत्र प्रभार देऊन राज्यमंत्री बनवता येणार नाही, असे राष्ट्रवादीने म्हटल्याचे फडणवीस म्हणाले. शिवाय युती करारांचे पालन करण्याचे महत्त्व पटवून देत भविष्यातील विस्तारात राष्ट्रवादीचा समावेश केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (हेही वाचा - PM Modi Cabinet 3.0: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कोण किती शिकलेलं? काही मंत्री 12वी पास तर काहींनीचं पूर्ण केली आहे पदव्युत्तर पदवी, वाचा सविस्तर)
नारायण राणे यांना डच्चू
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत, महाराष्ट्रात भाजपची घसरण झाली. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये राज्याच्या 48 पैकी 23 जागा भाजपने जिंकल्या होत्या. मात्र लोकसभा निवडणूक 2024 मध्ये आगोदरच्या तुलनेत केवळ नऊ जागा जिंकल्या. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सात जागा मिळाल्या, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला फक्त एक जागा मिळाली. गडकरी, गोयल, खडसे आणि मोहोळ हे अनुक्रमे नागपूर, मुंबई उत्तर, रावेर आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. उल्लेखनीय म्हणजे, नारायण राणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून विजयी होऊनही त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा समाविष्ट करण्यात आले नाही. मागील सरकारमधील भाजपचे इतर तीन मंत्री - रावसाहेब दानवे, भारती पवार आणि कपिल पाटील यांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पराभवामुळे त्यांना त्यांच्या जागा गमवाव्या लागल्या.