Dead Body | Pixabay.com

मुंबई मध्ये कल्याण रेल्वे स्थानकामध्ये 43 वर्षीय एका पोलिस ऑफिसरचा लोकल ट्रेन मधून पडून मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, मृत पोलिसाचं नाव दत्तात्रय लोखंडे आहे. ते कामावर जात असताना हा अपघात झाला असून त्यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. ही घटना 1 नोव्हेंबरची कल्याण स्थानकामधील आहे. दत्तात्रय यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत. रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, दत्तात्रय लोखंडे हे मूळचे परभणीच्या एका गावामधील होते. घाटकोपर मध्ये रेल्वे पोलिस हेडक्वॉर्टर मध्ये ते कामाला होते. घाटकोपरला कामावर येत असताना शुक्रवारी सकाळी त्यांच्यावर हा प्रसंग बेतला.

लोखंडे हे घाटकोपर येथे ड्युटीवर रुजू होण्यासाठी जात असताना शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, लोखंडे हे लोकल ट्रेन पकडण्यासाठी कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आले. सकाळी 10.50 च्या सुमारास दत्तात्रय हे अनोळखी गाडीतून पडून जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी प्राथमिक तपास सुरू केला. त्यानंतर लोखंडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून अकस्मात मृत्यूची नोंद केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी या घटनेला दुजोरा दिला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा आढावा घेतला जात असल्याचे सांगितले. मात्र, लोखंडे ज्या ठिकाणी पडले त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची माहिती आहे, त्यामुळे तपास गुंतागुंतीचा झाला आहे. प्राथमिक तपासादरम्यान पोलिसांना असेही कळले की काही महिन्यांपूर्वी झालेल्या बदलीमुळे दत्तात्रय हे तणावाखाली होते.

लोखंडे यांच्यावर गोमांस बाळगल्याचा खोटा आरोप करून काही तरुण प्रवाशांनी एका वृद्ध व्यक्तीला ट्रेनमध्ये मारहाण केल्याच्या प्रकरणात त्यांच्यावर आणि इतर अधिकाऱ्यांवर निष्क्रियतेचा आरोप झाल्यानंतर त्यांची बदली करण्यात आल्याचे दिसून आले.