कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रार्दुभाव टाळण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊन मुळे विवाह इच्छुकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. लॉकडाऊन दरम्यान अनेक लग्न रद्द झाली तर काही पुढे ढकलण्यात आली. मात्र या बोहल्यावर चढू इच्छिणा-यांसाठी पुणे महापालिकेने आनंदाची बातमी सांगितली आहे. पुणे जिल्ह्यात कंटेनमेंट झोन वगळता कुठेही 50 नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न करण्यास आता परवानगीची गरज नाही. मात्र, यासाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. लग्न समारंभात सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळल्यास विवाह करण्यास काहीच बाधा येणार नाही असे सांगण्यात आले आहे.
सरकारने 3 मे रोजी लॉकडाऊन शिथिल करण्याच्या आदेशामध्ये काही मार्गदर्शक सूचनांचा उल्लेख केला आहे. याचे नीट पालन केल्यास लग्न सोहळ्याला अनुमती देण्यास काहीच हरकत नाही असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. नवी मुंबई: वाशी येथील विवाहसोहळ्यात Coronavirus पासून खबरदारी म्हणून मास्क, सॅनिटायझरचे वाटप
विवाह सोहळ्यासाठी या आहेत महत्त्वाच्या अटी:
- पुणे जिल्ह्यात 50 लोकांमध्ये लग्न करण्यासाठी परवानगीची गरज नाही.
- कंटेनमेंट झोन वगळता जिल्हांतर्गत कुठेही जाऊन लग्न करता येऊ शकते.
- पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील इतर कंटेनमेंट झोन वगळून जिल्हांतर्गत लग्नासाठी परवानगीची गरज नाही
- सुरक्षित सामाजिक अंतर ठेवून आणि नियमांचं काटेकोर पालन बंधनकारक कंटेनमेंट झोनमधील व्यक्तींना या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित राहता येणार नाही. त्याचबरोबर कोणालाही कंटेनमेंट झोनमधून ये-जा करता येणार नाही.
सद्य स्थितीत महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची एकूण संख्या 29,100 इतकी झाली आहे. काल दिवसभरात राज्यात कोरना व्हायरस संक्रमित 1,576 नव्या रुग्णांची नोंद झाली. काल दिवसभरात कोरोना व्हायरस संक्रमित 49 रुग्ण दगावले. राज्यात मृत्यू झालेल्या कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 1,068 इतकी झाली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने पीटीआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.