Mark Zuckerberg (Photo Credits-Twitter)

Meta Apologizes for Mark Zuckerberg’s Statement: मार्क झुकेरबर्गच्या (Mark Zuckerberg) 2024 च्या निवडणुकांबाबतच्याच्या टिप्पणीवर मेटा (META) बॅकफूटवर आला आहे. याप्रकरणी कंपनीने माफी मागितली आहे. अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असे कंपनीने म्हटले आहे. मेटा इंडियाचे सार्वजनिक धोरण संचालक म्हणून काम करणारे शिवनाथ ठाकुरल यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये सीईओच्या वतीने माफी मागितली आहे. ते म्हणाले, '2024 च्या निवडणुकीत अनेक विद्यमान पक्ष पुन्हा निवडून आले नाहीत, हे मार्कचे विधान अनेक देशांसाठी खरे आहे, परंतु भारताच्या बाबतीत असे नाही. या अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. मेटासाठी भारत हा एक अविश्वसनीय महत्त्वाचा देश आहे आणि आम्ही त्याच्या उज्ज्वल भविष्याच्या केंद्रस्थानी असण्याची अपेक्षा करतो.'

मंत्री अश्विनी वैष्णव यांची टीका-

यापूर्वी, मेटा कंपनी मार्क झुकरबर्गच्या भारतीय निवडणुकांशी संबंधित टिप्पण्यांबाबत अडचणीत असल्याचे दिसत होते. संसदीय समितीने कंपनीविरुद्ध समन्स जारी करण्याचा निर्णय घेतला होता. समन्सची बातमी अशा वेळी समोर आली होती, जेव्हा त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच सोमवारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मार्क झुकेरबर्ग यांच्या वक्तव्याला चुकीचे ठरवले असून, भारतातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला असून, झुकेरबर्ग यांचा दावा चुकीचा असल्याचे वास्तव मांडले आहे महामारीनंतरही भारतातील नागरिकांचा सध्याच्या सरकारवर विश्वास कायम आहे, असे ते म्हणाले होते.

Meta Apologizes for Mark Zuckerberg’s Statement: 

मार्क झुकरबर्गची भारतीय निवडणुकांबाबत टिपण्णी-

मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये म्हटले आहे की, 2024 हे वर्ष जगासाठी गोंधळाचे होते आणि कोविड नंतर झालेल्या निवडणुकीत भारतासह अनेक देशांची सरकारे पडली. या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली, कारण वस्तुस्थितीच्या आधारे हा दावा चुकीचा होता. भारताबाबत मार्कचे म्हणणे पूर्णतः चुकीचे असल्याचे मंत्र्यांनी म्हटले होते. (हेही वाचा: पबजी गेमकडून 2.93 लाखांहून अधिक खाती बंद; चीट सॉफ्टवेअर वापरल्याबद्दल 9,092 डिव्हाइस निलंबित)

मेटाला मागावी लागेल माफी-

या प्रकरणी दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञानविषयक संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष आणि भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणाले होते की, चुकीची माहिती पसरवल्याबद्दल मेटाला माफी मागावी लागेल. या चुकीच्या माहितीवर माझी समिती मेटाला कॉल करेल. कोणत्याही लोकशाही देशाविषयी चुकीच्या माहितीमुळे देशाची प्रतिमा मलिन होते. या चुकीबद्दल त्या संस्थेला भारतीय संसद आणि जनतेची माफी मागावी लागेल. याबाबत निर्माण झालेल्या गोंधळानंतर आता मेटा इंडियाचे उपाध्यक्ष शिवनाथ ठुकराल यांनी या प्रकरणावर मार्क झुकरबर्गने दिलेल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे.