समुपदेशन करणे, योग्य दिशा दाखवणे हे मानसशास्त्रज्ञाचे (Psychologist) काम आहे. मात्र नागपूर (Nagpur) येथील एका मानसशास्त्रज्ञाने मदत करण्याच्या बहाण्याने अनेक मुलींवर शारीरिक अत्याचार करत त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. मुलींचा हा आकडा फक्त एक-दोन नसून तब्बल 50 हून अधिक आहे. महत्वाचे म्हणजे यामध्ये अनेक अशा मुलींचा समावेश आहे, ज्या अल्पवयीन असताना या मानसशास्त्रज्ञाने त्यांच्यावर बलात्कार (Rape) केला होता. त्यानंतर त्यांच्या लग्नानंतरही तो त्यांना त्यांचे पूर्वीचे फोटो दाखवून ब्लॅकमेल करत बलात्कार करत होता.
नागपूर येथे राजेश ढोके नावाचा हा मानसशास्त्रज्ञ गेल्या 15 वर्षांपासून 50 हून अधिक मुलींचे ब्लॅकमेलिंग आणि लैंगिक शोषण करत होता. या मानसशास्त्रज्ञाचे वय 47 वर्षे असून तो दोन मुलींचा पिता आहे. तो नागपूर येथे क्लिनिक चालवायचा तसेच मुलांना निवासी मानसशास्त्रीय समुपदेशनही देत असे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांसारख्या ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलांचे तो समुपदेशन करत असे.
या समुपदेशन शिबिराच्या नावाखाली तो गरीब मुलींवर बलात्कार करायचा. इतकेच नाही तर, आरोपीने आपल्या परिसरातील अनेक महिलांची छेडही काढली आहे. याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. त्याच्या अशा या कृत्यामुळे त्याला रस्त्यामध्ये अनेकदा मारहाणही झाली आहे. असे असतानाही राजेश ढोकेने आपले असे कृत्य सुरूच ठेवले. (हेही वाचा: kerala Shocker: माणुसकीला काळीमा फासणारी घटना! केरळमध्ये महिला खेळाडूवर 2 वर्षांपासून बलात्कार; प्रशिक्षकासह 60 जण आरोपी, 6 जणांना अटक)
आरोपीने एका महिलेला ब्लॅकमेल करून तिला भेटण्यासाठी वारंवार बोलावल्याने ही बाब उघडकीस आली. त्याला वैतागून ही महिला पोलिसांकडे गेली व सर्व माहिती कथन केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी राजेशवर लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायदा आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी एक विशेष समितीही स्थापन केली आहे.