Ex-IAS Trainee Officer Puja Khedkar (Photo Credits: IANS)

निलंबित माजी IAS अधिकारी पूजा खेडकरला (Puja Khedkar) आज सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court Of India) तात्पुरता दिलासा मिळाला आहे. नागरी सेवा परीक्षेत ओबीसी प्रवर्ग आणि दिव्यांगांच्या कोट्यामध्ये आरक्षणाचा लाभ घेतल्याप्रकरणी पूजा वर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आता तिला 14 फेब्रुवारी पर्यंत अटक न करण्याच्या सूचना आज सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने जामीनासाठी तिच्याकडून करण्यात आलेल्या याचिकेला फेटाळले होते त्यामुळे पूजावर अटकेची कारवाई होण्याची टांगती तलवार आहे.

सर्वोच्च न्यायालयामध्ये आज न्यायमूर्ती बी व्ही नागरथना आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर सुनावणी झाली. अटकपूर्व जामीन अर्जाबाबत दिल्ली सरकार आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाला (UPSC) सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

यूपीएससी कडून कोट्याचा चुकीच्या पद्धतीने फायदा उचलत स्वत:ची बनावट ओळख सादर केल्याच्या प्रकरणी पूजा खेडकर विरुद्ध फौजदारी कारवाई सुरू केली आहे. दिल्ली पोलिसांनी तिच्याविरुद्ध अनेक गुन्ह्यांमध्ये एफआयआरही दाखल केला आहे. सध्या केंद्र सरकारकडून पूजा खेडकरच्या प्रकरणात तिची यूपीएससी मध्ये निवड कशी झाली? याचा शोध घेण्यासाठी एक समिती देखील स्थापन करण्यात आली आहे.