खबरदार! पुणे विभागात रेल्वेचा अपघात करण्याचे प्रयत्न; घातपाताचा कट शिजत असल्याचा संशय
Indian Railways | (Photo credit: file photo)

पुण्यामध्ये (Pune) गेल्या काही दिवसांपासून रुळावरून रेल्वे खाली पडण्याचा प्रयत्न केला जात आहे. रुळावर लोखंडी वस्तू ठेऊन रेल्वेला घातपात (Train Accident) करण्याचा डाव असल्याची माहिती  पुणे रेल्वे पोलिसांनी दिली आहे. गेल्या 3-4 महिन्यात जवळपास 8 ते 10 वेळेस अशा प्रकारच्या घटना पुणे रेल्वे विभागात समोर आल्या आहेत. काही वेळेस रेल्वेचे इंजिन रुळावरून घसरले, मात्र रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हे अपघात टळले. असे असले तरी, ही एक गंभीर बाब असल्याने याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

रेल्वेच्या पुणे विभागात, रेल्वे क्रॉसिंगजवळ रुळावर लोखंडी वस्तू ठेऊन रेल्वेचा अपघात करण्याचे सत्र सुरु आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जवळ हातकणंगले आणि रुकडी मार्गावर रेल्वे रुळांमध्ये लोखंडी दांडा आढळून आला होता. अशाप्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत, त्यावरून रेल्वेचा अपघात घडवण्याचा प्रयत्न केला जात असावा असा अंदाज रेल्वे पोलिसांनी वर्तवला आहे.

(हेही वाचा: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी विशेष 166 गाड्या, 25 मे पासून बुकिंग; जाणून घ्या वेळापत्रक)

रेल्वे अधिकारी आणि लोको पायलट्सच्या सतर्कतेमुळे अद्याप कोणताही मोठा अपघात घडला नाही, मात्र लवकरच ही टोळी हाती आली नाही, तर अनर्थ घडू शकतो. काही दिवसांपूर्वी मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस बाबतीतही असाच अनुभव आला होता. मात्र लोको पायलटने दाखवलेल्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला. आता रेल्वे प्रशासन याबाबत अतिशय सतर्क झाले असून, अशा समाजकंटकांचा शोध घेणे चालू आहे. दरम्यान, अशा प्रकारे कोणी व्यक्ती रुळावर काही ठेवताना दिसली अथवा रुळावर कोणतीही वस्तू आढळून आली तर ताबडतोब रेल्वे प्रशासनाशी अथवा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.