Pimpri Chinchwad News: 'सर्वश्रेष्ठ दान रक्तदान' हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण यात आता अवयवदान (Organs Donate) समाविष्ठ करायला हवे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथे राहणाऱ्या अक्षत लोहाडे यांच्या रुपात हे प्रकर्षाने पुढे आले आहे. स्पोर्ट बाईक चालवताना अक्षत याचा अपघाती मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर शरीरातील प्राण निघून जातात. उरतो तो फक्त देह. जो अंत्यसंस्कार करुन निसर्गातच विलीन केला जातो. पण, अक्षतच्या कुटुंबीयांनी अवयव दान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. ज्यामुळे जवळपास सात जणांना फायदा झाला. अक्षतचे डोळे, फुफ्फुस, यकृत, किडनी, मूत्रपिंड आणि हृदय हे सात अवयव दान करुन इतरांचे प्राण वाचवले.
खेळायला जातो म्हणून स्पोर्ट बाईकवरुन मित्रांसोबत राईडला गेलेला अक्षत बराच वेळ झाला तरी घरी परत आला नाही. त्यामुळे कुटुंबीयांना काळजी लागून राहिली. त्यांनी शोधाशोध सुरु केली. दरम्यान, ती अप्रिय बातमी आलीच. अक्षत याचा अपघात झाला होता. अपघातात जबर मार लागल्याने त्याचा ब्रेन डेड (Brain Dead) झाला. कुटुंबीय कासावीस झाले. काय करावे त्यांना कळत नव्हते. अशाही स्थितीत त्यांनी स्वत:ला सावरले. अक्षय तर परत येणार नाही. मग त्यांनी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे सात जणांना जीवदान मिळाले.
अक्षतच्या आठवणींनी कुटुंबीय बैचेन झालेलेले स्पष्ट दिसत होते. अपघात घडण्यापूर्वी आपल्या बहिणीच्या अंगाखांद्यावर खेळणारा अक्षत आपल्यात नाही ही कल्पनाही कुटुंबीयांना सहन होत नव्हती. मात्र, आता वास्तव तर स्वीकारावे लागणार होते. अक्षतच्या आठवणीच त्यांच्याकडे होत्या. दरम्यान, या आठवणी चिरंतन ठेवण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे या व्यक्तींच्या रुपात ते अक्षतच्या आठवणी कायम ठेऊ शकतात.