DEMU (Photo Credits: WIki Commons)

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या फलटण ते लोणंद (Phaltan to Lonand) रेल्वेमार्गाला अखेर हिरवा कंदील मिळाला असून येत्या 12 सप्टेंबरपासून या मार्गावर डेमु धावणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून रेल्वे प्रवासी या डेमूची (DEMU) आतुरतेने वाट पाहत होते. 12 सप्टेंबरपासून सुरु होणा-या या डेमू सेवेमुळे प्रवाशांना फार मोठा दिलासा मिळणार आहे.

मागील अनेक वर्षांपासून लोणंद ते फलटण डेमूचे काम सुरु होते. लोणंद ते फलटण हे अंतर अंदाजे 26 किलोमीटर आहे. काही महिन्यांपूर्वी या मार्गावरून ही रेल्वेगाडी सुरु करण्याची मान्यता मिळाली. त्यानंतर या गाडीच्या अनेक चाचण्या झाल्या. त्यात यशस्वी झाल्यानंतर आता अखेर 12 सप्टेंबर पासून ही डेमू या रेल्वेमार्गावर धावणार आहे. 11 सप्टेंबर रोजी फलटण येथे या रेल्वेचा लोकार्पण सोहळा होणार आहे. हेही वाचा- गणेशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने घेतला हा निर्णय; मुंबई ते कोकण या दरम्यान 2 विशेष रेल्वे धावणार

रविवार सोडून इतर सर्व दिवशी ही डेमू धावणार आहे. यात लोणंदहून सकाळी 7.20 मिनिटांनी सुटलेली डेमु 8.50 मिनिटांनी फलटण स्थानकात पोहोचेल. तर फलटणहून सकाळी 9.30 मिनिटांनी सुटलेली डेमू 11 वाजता लोणंदमध्ये दाखल होईल. दुसरी डेमू सकाळी 11.35 मिनिटांनी लोणंद स्थानकातून सुटून दुपारी 1.05 मिनिटांनी फलटणमध्ये दाखल होईल. तर परतीची डेमू दुपारी 1.45 मिनिटांनी सुटून 3.15 मिनिटांनी लोणंद स्थानकात दाखल होईल.

तसेच ही डेमू तरडगाव आणि सुरवडी स्थानकातही थांबेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. लोणंद स्थानकात तसेच गाडीमध्ये या रेल्वेचे तिकिट उपलब्ध होईल. या सेवेचा फायदा प्रवाशांना निश्चित होईल अशी आशा रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.