Period Room: मासिक पाळी काळातील सोयीसाठी झोपडपट्टीतील महिलांसाठी 'पीरियड रूम'; ठाणे मनपा राबवतीय देशातील पहिला उपक्रम
Period Room (Photo Credits: Twitter/POS_Muse)

देशात पहिल्यांदाच ठाणे महानगरपालिकेने (TMC) एका स्वयंसेवी संस्थेच्या (NJO) सहकार्याने सार्वजनिक शौचालयात महिलांसाठी पीरियड रूम (Period Room) उभारली आहे. महिलांना मासिक पाळी काळातील समस्यांना तोंड देता यावे म्हणून ही कल्पना अंमलात आणली गेली आहे. यासाठी ठाण्याच्या झोपडपट्टी भागात एक सर्वेक्षण केले गेले, ज्यामध्ये सुमारे 1000 महिलांचा समावेश होता. या सर्वेक्षणानंतर समाजात अशा प्रकारची कल्पना आणण्याचा विचार झाला. याद्वारे झोपडपट्टी भागातील महिलांना मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

म्युझ फाउंडेशनने (Muse Foundation) केलेल्या सर्वेक्षण अहवालानंतर हे लक्षात आले की झोपडपट्टी भागातील महिलांना मासिक पाळीवेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. म्हणूनच एनजीओने टीएमसीला 'पीरियड रूम' ची कल्पना सुचविली होती. 2019 मध्ये ठाण्यात 15 झोपडपट्ट्यांमधील 1000 महिलांचा सहभाग असणारे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये महिलांच्या मासिक पाळी स्वच्छतेचा अभ्यास केला गेला. याबाबत मनीष जोशी, उपायुक्त, ठाणे महानगरपालिका म्हणाले, या सर्वेक्षणातील प्राथमिक निष्कर्षांवरून झोपडपट्ट्यांमधील महिला सार्वजनिक शौचालयावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्याचे आढळले.

तसेच पाळीच्या वेळी सामना करावा लागत असलेल्या इतर समस्याही समोर आल्या, ज्यामध्ये पाण्याची कमतरता, असुरक्षित खोल्या, खराब नॅपकिन्सची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा नसल्यामुळे येणाऱ्या अडचणी अशा काहींचा समावेश होता. या सर्व गोष्टी डोक्यात ठेऊन पीरियड रूम उभारण्यात आल्या. या स्थापन केल्या गेलेल्या पीरियड रूममध्ये जेट्सप्रेसह पाण्याचा पुरवठा, आरसे, पायाचा वापर करून उघडणारे डस्टबिन बसवले आहे, यामुळे हातांचा थेट होणारा स्पर्श टाळला जाणार आहे. (हेही वाचा: बांधकाम विकासकांना प्रीमियम मध्ये 50% सवलत; पाहा महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठक निर्णय)

तसेच या ठिकाणी सोप डिस्पेंसर, कपडे टांगण्यासाठी हूक आणि वॉश रूम यांचाही समावेश आहे. झोपडपट्टी भागात राहणाऱ्या महिलांच्या गरजा लक्षात घेऊन खोलीची रचना 'रीसायकल बिन' द्वारे केली गेली आहे. कम्युनिटी टॉयलेटची भिंत विविध रंगांनी रंगविली गेली आहे जेणेकरून लोकांचा उत्साह रहावा आणि त्याद्वारे स्वच्छतेचा संदेश वाढीस लागावा.