File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Case) याच्या आत्महत्येची चौकशी सध्या बिहार पोलीस करत आहेत. सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर बिहार पोलिसांचे एक पथक मुंबई दाखल झाले आहे. मात्र, याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी पटणाहून मुंबईत आलेले आयपीएस अधिकारी विनय तिवारी (Binay Tiwari) यांना नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार मुंबई महानगरपालिकेने (BMC) सक्तीने क्वारंटाईन केले आहे. यामुळे ते गोरेगावच्या एका गेस्टहाऊसमध्ये राहत आहेत. तसेच त्यांच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्कादेखील मारला गेला असून पुढील आदेश येऊपर्यंत त्यांना तिथेच थांबण्यास सांगितले गेले आहे. विनय तिवारी हे काही दिवस चौकशीसाठी कोणालाच भेटू शकत नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. यावर बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर यांनी नाराजी दर्शवली आहे.

सुशांतने 14 जून रोजी मुंबई येथील आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर संपूर्ण सिनेसृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. तसेच त्याने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी मुंबई पोलीस गेल्या काही दिवसांपासून चौकशी करत आहेत. मात्र, सुशांतच्या नातेवाईकांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केलेली आहे. दरम्यान, सुशांतचे वडिलांनी पटणा येथे तक्रार दाखल केल्यानंतर बिहार पोलिसांचे एक पथक मुंबईत दाखल झाले आहे. या पथकाचे नेतृत्व आयपीएस अधिकारी विनय तिवारी करत आहेत. हे देखील वाचा- बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे राजकारण करून महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याच षडयंत्र रचले जातेय- गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

एएनआयचे ट्वीट-

“बिहार पोलीस पथकाचे नेतृत्व करण्यासाठी आयपीएस अधिकारी विनय तिवारी रविवारी मुंबईत दाखल झाले. पण रात्री 11 वाजता मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांना सक्तीने क्वारंटाइन केले आहे. विनंती करुनही त्यांना आयपीएस मेसमध्ये राहण्यासाठी जागा मिळाली नाही. ते गोरेगावच्या एका गेस्टहाऊसमध्ये राहत आहेत” असे बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी टि्वट केले आहे.