Shiv Sena 54th Foundation Day: उद्धव ठाकरे म्हणाले 'या' कारणासाठीच मुख्यमंत्री झालो; शिवसेना वर्धापन दिन साधेपणाने साजरा
Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

दिलेला शब्द पाळणं आणि एखाद्यावर विश्वास ठेवणं ही आमची कमजोरी नाही. ती आमची संस्कृती आहे. अन्यायाविरुद्ध लढ्यासाठीच शिवसेनेचा जन्म झाला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तीच परंपरा घेऊन मी पुढे निघालो आहे. मात्र, आपल्यासोबत राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. राजकारण मोडीत काढण्यासाठीच मी मुख्यमंत्री झालो आहे, असे मुख्यमंत्री तथा शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे. शिवसेना पक्षाचा आज 54 वा वर्धापन दिन (Shiv Sena 54th Foundation Day) साजरा झाला. या वेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपला वर्धापन दिन अत्यंत साधेपणाने साजरा केला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. या वेळी बोलताना ठाकरे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना कोरोना व्हायरस, निसर्ग चक्रीवादळ अशा संकटात नागरिकांना केलेल्या मदतीची, राबवलेल्या उपक्रमांची, कामाची माहिती दिली. तसेच, शिवसेनेने आपली विचारसरणी बदलली नाही. तसेच शिवसेना कोणासमोर लाचारही होणार नाही, असे ठणकावून सांगितले.(हेही वाचा, Shiv Sena 54th Foundation Day: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना वाटचाल, स्वप्नपूर्ती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजकारण यांबाबत 5 ठळक मुद्दे)

शिवसैनिकांच्या कामाचे कौतुक करत उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसैनिक कोणत्याही संकटात धावून जातो. कोरोना व्हायरस आणि निसर्ग चक्रीवादळ संकटातही ते दिसून आले. शिवसैनिक प्रत्येक ठिकाणी भक्कमपणे उभा आहे. शिवसेना पक्षाच्या शाखा आता दवाखाने बनल्या आहेत. सर्व उपयोगी वस्तू डॉक्टरांना दिल्या जात आहेत. असे जीवाची बाजी लावून काम करणारे शिवसैनिक जोपर्यंत माझ्यासोबत आहेत तोपर्यंत मला कुणाचीही भीत नाही. शिवसेना स्वत:च एक वादळ आहे. त्यामुळे शिवसेना ही इतर वादळांची पर्वा करत नाही, असेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.  (हेही वाचा, भाजप फारच नंतर आला, शिवसेना नेतृत्वाने या आधीही अनेक पक्षांशी केली आहे युती, हा पाहा इतिहास)

दरम्यान, शिवसेनाप्रमुख म्हणायचे की शिवसैनिक हे माझ्या भोवतीचे कवच आहे. त्याचा वचकही आह. याच शिवसैनिकांच्या प्रेमाचा ओलावा माझ्या अंगावर आहे. त्यामुळे आपल्यासोबत संपर्क कमी झाला असला तरी नात्यात अंतर पडू देणार नाही, हा माझा शब्द आहे, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी या वेळी शिवसैनिकांना दिला. गेल्या काही दिवसांपासून उद्धव यांचा पक्षातील नेत्यांशी संपर्क कमी झाल्याची भावना व्यक्त होत होती. त्या पार्श्वभूमीवर उद्धव यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. दरम्यान, उद्धव ठांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतानाच शिवसैनिकांना काळजी घेण्याचे अवाहनही केले.