
कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट हाताळणीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रावर आरोप केला जात आहे. परंतू, मुंबई, ठाणे, पुणे या शहरांमध्ये देशभरातून नागरिक आले आहेत. या शहरांची, राज्याची चुक झाली का की महाराष्ट्राबाहेरील नागरिकांना या ठिकाणी स्थायिक होऊ दिले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी संसदेत उपस्थित केला. आमच्या शहरांबद्दल काहीही बोललेले खपवून घेतले जाणार नाही, असेही ते या वेळी म्हणाले. संसदेचे पावसाळी अधिवेशन (Parliament's Monsoon Session) सुरु आहे. अधिवेशनादरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार काहीसे आक्रमक पाहायला मिळाले. शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपली भूमिका काहीशी आक्रमकपणे मांडली.
संसद अधिवेशनात बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, कोरोना व्हायरस संटाविरुद्धची लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढली जात आहे. लढाई सुरु आहे. मात्र काही राज्यांवर वेगवेगळे आरोप केले जात आहेत. परंतू, जे ही काही केले जात आहे ते केंद्र सरकारच्या निर्देशावरुनच केले. देशात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आणि सध्या सुरु असलेला अनलॉक हेसुद्धा केंद्र सरकारने आणि आरोग्य मंत्रालयाने घालून दिलेल्या निर्देशानुसारच होत आहे. त्यामुळे राज्ये काही वेगळे करत आहेत असा त्याचा अर्थ काडला जाऊ नये असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले. (हेही वाचा, Parliament's Monsoon Session: कोरोना संक्रमित लोक पापड खाऊन बरे झाले का? राज्यांचे GST चे पैसे द्या; शिवसेना खासदार संजय राऊत राज्यसभेत आक्रमक (पाहा व्हिडिओ))
देशासमोर सध्या विविध विषय आहेत. असे असतानाही काही लोक उगाचच वेगळे वषय पुढे आणत आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी देशातील विविध ठिकाणांहून लोक येत आहेत. मात्र काही लोक कारणाशिवाय आमचे राज्य, शहरांंबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. काहीही बोलत आहेत, हे आम्ही सहन करणार नाही, असेही प्रफुल्ल पटेल या वेळी म्हणाले
दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांच्या आगोदर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. संजय राऊत नेहमीप्रमाणे आजही आपली भूमिका आक्रमकपणे मांडताना दिसले. देशाची आर्थिक स्थिती सध्या प्रचंड गंभीर आणि नाजूक बनली आहे. एका बाजूला GDP घसरला आहे. दुसऱ्या बाजूला आमची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कंगाल झाली आहे. हे सुरु असतानाच देशासमोर कोरोना व्हायरस संकट उभे ठाकले आहे. या काळात केंद्र सरकारने राज्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले पाहिजे, असे अवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला केले. राज्य सरकार कोरना नियंत्रणासाठी योग्य पावले टाकत आहे. तसे नसते तर मग 'कोरोना संक्रमित लोक पापड खाऊन बरे झाले का?' असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.