Parliament's Monsoon Session: कोरोना संक्रमित लोक पापड खाऊन बरे झाले का? राज्यांचे GST चे पैसे द्या; शिवसेना खासदार संजय राऊत राज्यसभेत आक्रमक (पाहा व्हिडिओ)
Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

देशाची आर्थिक स्थिती सध्या प्रचंड गंभीर आणि नाजूक बनली आहे. एका बाजूला GDP घसरला आहे. दुसऱ्या बाजूला आमची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कंगाल झाली आहे. हे सुरु असतानाच देशासमोर कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट उभे ठाकले आहे. या काळात केंद्र सरकारने राज्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले पाहिजे, असे अवाहन शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारला केले. राज्य सरकार कोरना नियंत्रणासाठी योग्य पावले टाकत आहे. तसे नसते तर मग 'कोरोना संक्रमित लोक पापड खाऊन बरे झाले का?' असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला. ते संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान (Parliament's Monsoon Session) संसदेत बोलत होते. केंद्र सरकारने राज्यांचे GST चे पैसे त्वरीत द्यावेत, अशीही मागणी केली.

केंद्र सरकारने सेल लावला आहे

संजय राऊत यांनी राज्यसभेत बोलताना सांगितले की, एका बाजूला जीडीपी घसरला असताना, आरबीआयसुद्धा आर्थिक अडचणीत असताना आमच्या केंद्र सरकारने एयर इंडिया,रेलवे, LIC आणि इतर अनेक संस्था विकण्याचा सपाटा लावला आहे. केंद्र सरकारने संस्था विकण्याचा सेलच लावला आहे, असाही आरोप राऊत यांनी या वेळी केला. (हेही वाचा, Coronavirus: कोरोना पुढे, देश मागे हेच वास्तव; केंद्र सरकारचे फक्त वादे, दावे- शिवसेना)

जेएनपीटी खासगीकरणास शिवसेनेचा विरोध

शिवसेनेने जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ( JNPT) खासगीकरणास तीव्र विरोध दर्शवला आहे. अशा संस्थांचे खासगीकरण करणे म्हणजे केंद्र सरकारच्या सेलमधलाच भाग असल्याची टीकाही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.(हेही वाचा, Coronavirus: अवघ्या 24 तासात 97,894 जण कोरोना व्हायरस संक्रमित, एकूण रुग्णसंख्या 51 लाखांच्याही पुढे, देशात कोविड 19 चे विदारक चित्र)

महाराष्ट्र सरकारचे WHO कडून स्वागत

मुंबई शहर आणि आव्हान असलेली धारावीसुद्धा कोरोना व्हायरस संकटाचा धिराने सामना करत आहे. या ठिकाणी कोरोना व्हायरस पूर्णपणे नियंत्रणात आहे. त्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनेही मुंबईचे आणि राज्य सरकारचे कौतुक केले आहे. हे मी आवर्जून सांगत आहे कारण या ठिकाणी काही लोक टीका करत होते, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत टीकाकारांना लागावला.

दरम्यान, कोरोना व्हायरस संकटाचा हा काळ एकजूटीने लढण्याचा आहे. एकमेकांवर टीका करण्याचा नाही. काही लोक राज्य आणि केंद्र सरकारवर टीका करतात. पण, टीका करुन का साध्य होणार नाही, असेही संजय राऊत या वेळी म्हणाले.