Building | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबई मध्ये मांसाहारी शाकाहारी भेदभावातून मराठी माणसांना घरं नाकारली गेल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. मागील काही दिवसामध्ये अनेक कारणांनी मराठी माणसांना घर घेण्यापासून डावलल्याचा प्रकार समोर आला आहे. अशामध्ये आता ही अडवणूक रोखण्यासाठी नवीन इमारतीत घरांचे बुकिंग सुरू झाल्यानंतर एक वर्षापर्यंत मराठी माणसांसाठी घरांचे ५० टक्के आरक्षण ठेवावे. अशी मागणी ‘पार्ले पंचम’ (Parle Pancham) या सामाजिक संस्थेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. यामुळे आर्थिदृष्ट्या सक्षम असलेली मराठी माणसं घर घेऊ शकतील.

मुंबई मध्ये दिवसागणिक जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. आलिशान, सोयी सुविधांनी नटलेलं घरं बांधण्याच्या शर्यतीमध्ये आता घरांच्या किंमती कोटीच्या पार गेल्या आहेत. त्यामुळे सामान्य मराठी माणसाच्या आवाक्यामध्ये ही घरं राहिलेली नाहीत. ज्यांना ती घ्यायची आहेत त्यांना मांसाहारी असल्याचं कारण देत दूर केलं जात आहे. यासह अनेक लहान समस्यांकडे ‘पार्ले पंचम’चे अध्यक्ष श्रीधर खानोलकर यांनी लक्ष वेधलं आहे. दरम्यान त्यांनी आपल्या पत्राच्या प्रति राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अतुल सावे, शरद पवार, नाना पटोले यांनाही दिल्या आहेत. सोशल मीडीया प्लॅटफॉर्म ट्वीटर वर त्यांनी या प्रति टॅग केलेल्या आहेत.

मराठी माणसाच्या आवाक्यात घरं ठेवण्यासाठी सामान्यांना देखभालीचा खर्च परवडेल अशा लहान स्वरूपात 20% घरं बांधून ती वर्षभरासाठी 100% आरक्षणासह मराठी माणसांसाठी ठेवावीत अशी मागणी देखील पत्रात खानोलकरांनी केली आहे.