परभणी जिल्हा मतदारसंघ (Photo Credits: File Image)

Maharashtra Assembly Elections 2019: राज्यातील परभणी (Parbhani) जिल्ह्यात विधानसभेच्या परभणी, पाथरी, जिंतूर आणि गंगाखेड अशा एकूण 4 जागा आहेत. मात्र या चार जागांसाठी तब्बल 53 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. 2014 सालच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेन 1, राष्ट्रवादीने 2 तर 1 जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली होती. युतीमध्ये दोन्ही पक्षांनी यातील 2-2 जागा घेतल्या आहेत. 1990 पासून हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मात्र आता विरोधी पक्ष इथे आपली ताकद वाढवेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या निमित्ताने जाणून घेऊया परभणी जिल्ह्यातील मतदार संघांमधील महत्वाच्या लढती

गंगाखेड (Gangakhed) - परभणी जिल्ह्यातील हा एक महत्वाचा मतदारसंघ आहे. 2009 पर्यंत हा मतदारसंघ राखीव होता मात्र त्यानंतर तो सर्वसाधारण गटासाठी खुला करण्यात आला. 1995 पर्यत 4 वेळा निवडून येत शेकापने इथे आपली पकड मजबूत केले होती. मात्र त्यानंतर 1995 साली अपक्ष उमेदवाराने हा विजयश्री मिळवला. तिथून या मतदारसंघाचे राजकारण पूर्णतः बदलले. 1914 साली रत्नाकर गुट्टे, मधुसूदन केंद्रे आणि सीताराम घनदाट असे तीन श्रीमंत दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात होते. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मधुसूदन केंद्रे इथले विद्यमान आमदार आहेत.

यंदा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. मधुसूदन केंद्रे, शिवसेनेचे विशाल कदम, रासपचे रत्नाकर गुट्टे, वंचित बहुजन आघाडीच्या करुणा कुंडगीर, बहुजन विकास आघाडीचे गजानन गिरी, बसपाचे देवराव खंदारे, मनसेचे विठ्ठलराव जवादे, महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे सखाराम बोबडे व इतर अपक्ष अशे बौर्ण्गी लढत पाहायला मिळणार आहे.

पाथरी (Pathri) - 1990 पासून शिवसेनेच्या ताब्यात असणारा हा मतदारसंघ 2004 मध्ये राष्ट्रवादीच्या ताब्यात गेला. पुन्हा 2009 साली शिवसेनेच्या मीरा रेंगे विजयी झाल्या आणि 2014 साली अपक्ष उमेदवार मोहन फड यांनी बाजी मारली. सध्या ते इथले विद्यमान आमदार आहेत. यंदा इथे 10 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. यामध्ये बहुजन समाज पार्टीचे गौतम वैजनाथराव उजगरे, भारतीय जनता पार्टीचे आ.मोहन फड, काँग्रेसचे सुरेश वरपूडकर, आंबेडकर राईट रिपब्लिकन पार्टीचे अजय सोळंके, बहुजन मुक्ती पार्टीचे मोईज अन्सारी अब्दुल कादर, वंचित बहुजन आघाडीचे विलास बाबर यांचा समावेश आहे.

जिंतूर (Jintur) – 1990 पासून जिंतूर विधानसभा मतदारसंघात बोर्डीकर, कुंडलिक नागरे आणि विजय भांबळे यांची सत्ता राहिली आहे. सध्या राष्ट्रवादीचे विजय भांबळे हे इथले विद्यमान आमदार आहेत. मात्र इथले सध्याचे वारे हे शिवसेना-भाजप युतीकडे वाहत असलेले दिसून येत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत इथल्या जनतेने शिवसेना उमेदवाराला निवडून दिले होते. यंदा विधानसभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही इथे जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे यावेळच्या विधानसभेची सर्वांना उत्सुकता आहे.

यंदा पुन्हा राष्ट्रवादीकडून विजय भांबळे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

परभणी – 1972 साली पहिल्यांदा इथे कॉंग्रेसने विजय मिळवला होता. मात्र 1990 पासून परभणी जिल्ह्यात शिवसेना-भाजप एकत्र निवडणूक लढवत आहेत. तेव्हापासून हा मतदारसंघ शिवसेनच्या ताब्यात आहे. सध्या शिवसेनेचे डॉ. राहुल वेदप्रकाश पाटील हे इथले विद्यमान आमदार आहेत. यंदा शिवसेनेकडून राहुल पाटील, कॉंग्रेसकडून रविराज देशमुख मनसेकडून सचिन पाटील तर वंचितकडून शेख गौस निवडणूक लढवत आहेत. अशाप्रकारे इथे बहुरंगी निवडणूक होणार असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान सध्या कार्यरत असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपणार आहे. 21 सप्टेंबरला निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करत निवडणूकीची तारिख जाहीर केली. 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर 24 ऑक्टोबरला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.