भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. तसेच पंकजा या उद्या एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार असल्याचीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. उद्या भाजपचे दिवंगत नेते आणि पंकजा मुंडे यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. त्यामुळे, गोपीनाथ गडावर अनेकजण हजेरी लावतील असं देखील सांगण्यात येत आहे. अशा वेळेत पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना एक सूचक विधान केलं आहे ज्यामुळे त्या खरंच भाजप सोडणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
तुम्ही खरंच पक्षावर नाराज आहेत का या प्रश्नावर पंकजा मुंडे यांनी टीव्ही 9 मराठी ला एक सूचक उत्तर दिलं आहे. "इतके दिवस थांबला आहात. आणखी एक दिवस थांबा," असं हसत त्या म्हणाल्या. त्यामुळे, उद्या पंकजा त्यांची पुढील राजकीय भूमिका काय असणार आहे हे जाहीर करतील एवढं मात्र नक्की.
तसेच एकनाथ खडसे यांच्यासोबत झालेल्या त्यांच्या भेटीबद्दल बोलताना पंकजा म्हणाल्या की, "एकनाथ खडसे माझ्याकडे आले होते. जेवणाची वेळ होती. आम्ही एकत्र जेवण केलं. ही कौटुंबिक स्वरुपाची भेट होती. मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला."
उद्या गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कोण कोण येणार? या बद्दल, "ज्यांनी जाहीर केलं आहे ते पक्षातील सर्व जण येतील," असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
'मला भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकांचं आमंत्रण मिळत नाही,' एकनाथ खडसे यांचा खुलासा
दरम्यान, पंकजा मुंडे यांचा उद्या मेळावा होणार असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्या उद्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. परंतु, पंकजा यांच्या पोस्टर्सवर भाजपचं कमल मात्र दिसलेलं नाही. तसेच भाजपाचा एकही झेंडा त्यांच्या होणाऱ्या मेळाव्याच्या ठिकाणी लावण्यात आलेला नाही.