
भाजप नेते एकनाथ खडसे यांनी आज भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन ते अडीच तास ही चर्चा सुरु होती. या भेटीनंतर एकनाथ खडसे यांनी माध्यमांना त्यांच्यातील चर्चेविषयी माहिती दिली.
एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना भाजप पक्षावर अनेक आरोप केले आहेत. टीव्ही 9 या वृत्तवाहिनी ने दिलेल्या माहितीनुसार एकनाथ खडसे यांना भाजपच्या कोणत्याही कोअर कमिटीच्या बैठकांचे आमंत्रण येतंच नाही.
इतकंच नव्हे तर खडसे पत्रकारांशी बोलताना अनेक बड्या नेत्यांना खडे बोल सुनावले आहेत. ते म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याची चर्चा पंकजा मुंडे यांच्याशी करण्याची गरज नाही. माध्यमं सर्व दाखवत असतात. विनोद तावडेंना माझी मनधरणी करण्याची जबाबदारी दिली आहे की नाही याविषयी मला माहिती नाही. मात्र, मी आजही पक्षातच असल्याने मनधरणी करण्याची गरज नाही. मी पूर्वीही पक्षात होतो, पक्षाचं नेतृत्व केलं आहे. पण कुणाची मनधरणी करण्यासाठी कुणाची नेमणूक करावी, अशी प्रथा भाजपमध्ये याआधी तरी नव्हती. आता नव्यानं काही निर्माण झालं असेल, तर माहिती नाही.”
एकनाथ खडसे घेणार उद्धव ठाकरे यांची भेट; भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना प्रवेशाची चर्चा
पंकजा मुंडे यांच्याशी त्यांची कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, “गोपीनाथ गडावर शक्तीप्रदर्शन करण्याची आवश्यकताच नसते. कारण दरवर्षी लाखोंच्या संख्येने येथे मुंडे अनुयायी येतात. गोपीनाथ मुंडे हे ओबीसींचे मोठे नेते होते. त्यांनी सर्वांना मान्य असणारे नेतृत्व केलं आहे. म्हणूनच त्यांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी लोक येथे येतात. येथे राजकीय चर्चा होणार नाही. स्वतः गोपीनाथ मुंडे देखील भगवान गडावरील कार्यक्रमात राजकीय चर्चा करु नये, असं सांगायचे.”