![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/09/paneer-adulteration-784x441.jpg?width=380&height=214)
पनीर (Paneer) हा भारतीय आहारातील महत्त्वाचा घटक आहे, परंतु अलीकडे काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये पारंपारिक दुधाऐवजी वनस्पती तेल आणि इतर घटकांपासून बनविलेल्या पनीरचा वापर होत असल्याचे आढळले आहे. अशा पनीरमध्ये वनस्पती तेल, स्किम्ड मिल्क पावडर आणि इतर दुग्धमुक्त घटकांचा समावेश असतो, ज्यामुळे ते दिसायला आणि चवीलाही खऱ्या पनीरसारखे वाटते, परंतु त्यात दुधातील फॅट्स नसतात. आता महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी असा दावा केला की, राज्यातील अनेक हॉटेल्समध्ये मिळणारे पनीर हे दुधापासून नव्हे, तर वनस्पती तेलापासून बनलेले असते.
राज्याचे माजी कृषी मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, ते भेसळयुक्त पनीरवर बंदी घालतील. मंत्र्यांच्या विधानामुळे रेस्टॉरंट मालकांमध्ये आणि ग्राहकांमध्येही खळबळ उडाली. ते नाशिक येथे आयोजित कृषी प्रदर्शनाला संबोधित करत होते. याबाबत असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स (AHAR) चे अध्यक्ष अरविंद शेट्टी म्हणाले, मंत्र्यांनी पुराव्याशिवाय विधान करायला नको होते. आमच्या संघटनेअंतर्गत मुंबईत 8,000 आणि महाराष्ट्रात सुमारे 22,000 रेस्टॉरंट्स आहेत आणि आमचा एकही सदस्य भेसळयुक्त पनीर वापरत नाही.’
ते पुढे म्हणाले, आम्ही आमच्या ग्राहकांना दुधापासून बनवलेले पनीर देतो आणि ते चांगल्या तापमानात साठवले जाते. आमच्या सर्व सदस्यांचे नोंदणीकृत अन्न पुरवठादार आहेत. आम्ही नियमित तपासणी देखील करतो आणि अन्नाची गुणवत्ता राखली जाते याची खात्री करतो.’ मात्र ढाबे आणि रस्त्यावरील अन्न विक्रेत्यांची तपासणीची आवश्यकता असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. याबाबत ते म्हणाले, बाजारात मिळणारे सर्व पनीर स्वच्छ आणि दुधापासून बनलेले आहेत असे म्हणता येणार नाही. अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, महामार्गावरील ढाबे आणि लहान भोजनालयांची नियमित तपासणी करावी. (हेही वाचा: Indians' Food Habits: 'वाईट अन्न' हे भारतातील 56% आजारांचे कारण; खाऊ नयेत अशा पदार्थांचे सेवन करत आहेत देशातील लोक, AIIMS ने व्यक्त केली चिंता)
पनीरसारखे अन्नपदार्थ बनवण्यासाठी शुद्ध दुधाचा वापरच केला पाहिजे आणि गायीपालकांना त्याचा फायदा झाला पाहिजे. परंतु ते सुनिश्चित करणे हे सरकारचे काम आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉल्सवर तपासणी करावी आणि अन्न सुरक्षा मानकांचे पालन केले जात आहे याची खात्री करावी. विखे पाटील म्हणाले, ‘काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने वनस्पती तेलापासून पनीर उत्पादनास परवानगी दिली होती. त्यामुळे,बऱ्याच हॉटेलमध्ये मिळणारे पनीर हे दुधापासून नाही तर, सहसा वनस्पती तेलापासून बनवले जाते. दुधापासून बनवलेले पनीर काही ठिकाणी मिळू शकते, सर्वत्र नाही. केंद्र वनस्पती तेलापासून बनवलेल्या पनीरवर बंदी घालेल अशी अपेक्षा आहे.’