Election | (Photo credit: archived, edited, symbolic images)

आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे पंढरपूर विधानसभा मतदारसंघात (Pandharpur Assembly Constituency) पोटनिवडणूक (Pandharpur Assembly by-Election 2021) लागली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पर्यायाने महाविकासाआघाडी आणि भाजप (BJP) असा प्रमुख सामना रंगणार आहे. राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) तर भाजप कडून समाधान अवताडे (Samadhan Awatade) रिंगणात आहेत. असे असले तरी सर्वच पक्षात इच्छुकांची बहुगर्दी असल्याने मोठ्या प्रमाणावर बंडखोरी पाहायला मिळत आहे. त्यामुळे बंडखोरी मोडीत काढणे किंवा इच्छुकांचे मन वळविणे असे प्रयत्न प्रमुख पक्षांसह सर्वांनाच करावे लागत आहे. इतके करुनही आपली उमेदवारी कायम ठेवल्याने शिवसेना (Shiv Sena) महिला जिल्हा संघटक शैला गोडसे (Shaila Godse) यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. शैला गोडसे यांचे निलंबन करण्यात आले आहे.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 38 जणांनी 44 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे सहाजिकच स्पर्धा वाढली आहे. कोणते बंडखोर कोणाची मते खातात आणि कोणाला विजयासाठी कारण ठरतात की स्वत:च निवडून येतात याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Bye-Elections 2021: महाराष्ट्रातील पंढरपूरसह विविध राज्यांच्या लोकसभा/विधानसभा पोटनिवडणुकांचे वेळापत्रक जाहीर; 17 एप्रिल रोजी होणार मतदान)

भाजपसमोर बंडखोरीचे मोठे आव्हान

पंढऱपूर मतदारसंघात भाजपसमोर बंडखोरीचे मोठे आव्हान आहे. भाजपच्या परिचारक गटाचे पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती नागेश भोसले यांनीही बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भोसले यांनी उमेदवारी कायम ठेवली तर भाजपला पंढरपूर शहरातून धक्का बसू शकतो. दुसऱ्या बाजूला भाजप उमेदवार समाधान अवताडे यांना त्यांच्या घरातूनही आव्हान मिळाले आहे. अवताडे यांचे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर अवताडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

राष्ट्रवादीच्या वाटेवर बंडखोरीचे काटे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही बंडखोरी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीला केवळ पक्षातील बंडोखोरी नव्हे तर मित्रपक्षांच्या बंडखोरीलाही सामोरे जावे लागत आहे. पोटनिवडणुकीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेनेने सचिन पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या आधी भारत भालके हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फेच निवडून आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी ही उमेदवारी धोकादायक ठरु शकते.

शिवसेनेतूनही बंडखोरी

दरम्यान, राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आहे. त्यामुळे शिवसेनेने अर्थातच राष्ट्रवादीला अधिकृत पाठिंबा दिला आहे. असे असले तरी शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक शैला गोडसे यांनी उमेदवारी दाखल केली आहे आणि ती कायमही ठेवली आहे. त्यामुळे शिवसेनेने गोडसे यांच्यावर कारावाईचा बडगा उगारत त्यांचे निलंबन केले आहे.