पालघर (Palghar) जिल्ह्यातील बोईसर (Boisar) खैराफाटक (Khairafatak) येथे धावत्या ट्रेनखाली चिरडून एका महिलेसह 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुजरातहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या (ट्रेन क्रमांक-22966) बांद्रा टर्मिनल्स सुपरफास्ट एक्सप्रेस या ट्रेनखाली त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पालघर तसेच बोईसर परिसरात खळबळ उडाली आहे.
या अपघातात 35 वर्षीय महिलेसह 1 वर्षीय आणि 5 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेने आत्मत्या केली की, हा अपघात होता याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. मुंबईमध्ये दररोज अनेक रेल्वे अपघात होतात. यातील काही अपघात लोकलमधील गर्दीमुळे होतात. शनिवारी डोंबिवलीमध्ये लोकलमधून पडून एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. (हेही वाचा - छत्तीसगड: 11 वीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने हॉस्टेलच्या शौचालयात दिला मृत बाळाला जन्म)
गेल्याच महिन्यात डोंबिवलीजवळ लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू झाला होता. या घटनेत चार्मी प्रसाद या 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला होता. 16 डिसेंबरला रोजी ही घटना घडली होती. 2019 या वर्षात मुंबई विभागात 2 हजार 700 प्रवाशांच्या अपघाती मृत्यूची नोंद झाली आहे. रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांविरोधात दंडात्मक कारवाईही करण्यात येते. परंतु, तरीदेखील प्रवासी रेल्वे रुळ ओलांडतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडतात.