पालघर जिल्ह्यात गेल्या 24 तासात आणखी 323 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आकडा 11,403 वर पोहचला
Coronavirus (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा विळखा अधिक घट्ट होताना दिसून येत आहे. तर राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबईसह आता पालघर येथे ही कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. तर पालघर येथे गेल्या 24 तासात आणखी 323 कोरोनासंक्रमित रुग्णांची भर पडल्याने आकडा 11,403 वर पोहचला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात अधिक चिंता व्यक्त करण्यात येत असून नागरिकांमध्ये कोरोनासंबंधित भीतीचे वातावरण ही निर्माण झाले आहे.(महाराष्ट्रात COVID19 च्या रुग्णांचा मृत्यूदर 3.91 वर पोहचला)

पालघर ग्रामीण भागातल्या 2119 रुग्णांचा समावेश असून वसई-विरार महापालिका क्षेत्रातील 9284 कोरोनाच्या रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सर्वोतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचसोबत नागरिकांना सुद्धा कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यत आले आहे. तर कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी पुन्हा लॉकडाऊनचे आदेश स्थानिक प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहेत.(महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी; तुमच्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण आहेत जाणून घ्या)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी महापालिकेने पीएम केअर्स फंडच्या माध्यमातून केंद्राकडून राज्याला 446 व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती दिली होती. हे सर्व व्हेंटिलेटर्स एकत्रितपणे नव्हे तर टप्प्याटप्प्याने देण्यात आलेले आहेत. केंद्राकडून देण्यात आलेले हे व्हेंटिलेटर्स विविध कोविडच्या रुग्णालयात पुरवले जात असल्याचे ही महापालिकेने स्पष्ट केले आहे.