महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या (Mahrashtra Assembly Elections) रणधुमाळीत अनेक बड्या राजकीय पक्षांनी मोठमोठ्या नेत्यांना डावलून उमेदवारीपासून लांब ठेवले आहे. यामध्ये भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांचा समावेश आहे तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस मध्ये देखील अशीच काहीशी परिस्थिती दिसून येत आहे. यावरून वाद सुरु असताना औरंगाबाद (Aurangabad) येथील पैठण (Paithan) मतदारसंघात राष्ट्रवादीचे निष्ठावंत नेते संजय वाघचौरे (Sanjay Waghchoure) यांना संभ्रमीत ठेवत अखेरीस उमेदवारी न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुर उमटताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर वाघचौरे यांच्या युवराज चावरे (Yuvraj Chavre) या समर्थकाने राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले आहे.
लोकमत वृत्त वाहिनीच्या माहितीनुसार, युवराज चावरे यांनी पत्रात 'साहेब, ज्या संजय वाघचौरे यांनी गेल्या 20 वर्षांपासून पैठण तालुक्यात राष्ट्रवादी जिवंत ठेवली त्यांनाच डावलून पक्षाने काल प्रवेश केलेल्या एकाला उमेदवारी दिली. संजय वाघचौरे यांनी राष्ट्रवादीचे अनेक कार्यक्रम स्वखर्चातून घेतले. पक्षवाढीसाठी पायाला भिंगरी लावल्यागत फिरत पक्ष बांधणी केली, आणि त्यांच्यावर अन्याय झाला. पवारसाहेब, अजितदादा व जयंत पाटील साहेब आपल्या शब्दाच्या पुढे कधीही न गेलेले संजय वाघचौरे यांच्यावर हा अन्याय का? याकरता हे रक्तरंजित पत्र लिहित आहे. साहेब अजुनही वेळ गेलेली नाही. लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती. अन्यथा पैठण तालुक्यात निष्क्रीय लोकांच्या हातात उमेदवारी गेल्याने पक्षाचे अस्तित्व धोक्यात येण्यास वेळ लागणार नाही,' अशा आशयात नेते मंडळींकडे याबाबत लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
दरम्यान,काही दिवसांआधी पैठण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने दत्ता गोर्डे यांना एबी फॉर्म दिल्याचे समजत होते पण त्यावर आक्षेप घेत संजय वाघचौरे यांनी राष्ट्रवादीने आपल्याला सुद्धा एबी फॉर्म दिल्याचे म्हंटले होते, त्यांच्या या दाव्यानंतर पैठण मध्ये वेगळेच राजकीय नाट्य सुरु होते. अशातच शनिवारी झालेल्या अर्ज पडताळणी मध्ये वाघचौरेयांच्या एबी फॉर्म मध्ये त्रुटी निघाल्याने त्यांच्या जागी गोर्डे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मागील कित्येक वर्षांपासून वाघचौरे यांची राष्ट्रवादीची निष्ठा दाखवत नाराज कार्यकर्ता युवराज चावरे याने जयंत पाटील यांना पत्र लिहिले आहे.