OBC Political Reservation: महाराष्ट्र सरकारविरोधात खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली जळगावात आंदोलन
BJP (Photo Credit: Twitter)

सर्वोच्च न्यायलयाने (Supreme Court) ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण (OBC Political Reservation) रद्द केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद आता महाराष्ट्रात (Maharashtra) उमटू लागले आहेत. एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असतानाच आता ओबीसींसाठी राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र सरकारविरोधात राज्यात विविध ठिकाणी भाजपने आंदोलन सुरु केले आहे. याचपार्श्वभूमीवर भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव आंदोलन पुकारण्यात आले होते. जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात भाजपच्या आंदोलकांनी तब्बल तासभर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला.

ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापलेले दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर भाजपने राज्य सरकारविरोधात राज्यातील विविध भागामध्ये आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान, रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात सकाळी साडेअकरा वाजता या आंदोलनास सुरुवात झाली. त्यांच्यासोबत आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्यासह नगरसेवक, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते देखील आंदोलनात सहभागी झाले आहेत. हे देखील वाचा- BJP Chakka Jam Aandolan: ओबीसी राजकीय आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी नागपूरात घेतलं ताब्यात

महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी, मराठा आरक्षण गेले आहे. त्यासाठी ते आता केंद्राकडे बोट दाखवत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. ओबीसींना आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही असेही ते म्हणाले. एवढेच नव्हेतर, आमच्या हाती सत्ता द्या, चार महिन्यात आरक्षण देतो अन्यथा राजकारणातून सन्यास घेईन असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.