प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाऊन (Lockdown) ठेवण्यात आला आहे. मात्र देशाचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून आवश्यक त्या क्षेत्रावरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यासाठी केंद्र सरकारने 20 एप्रिलपासून नवीन नियमावली तयार केली आहे. तसेच राज्य सरकारने वृत्तपत्र छापण्यास अनुमती, स्टॉलवर त्यांची विक्री करण्यास अनुमती, मात्र त्यांचे घरोघरी वितरण करण्यास बंदी घातली होती. मात्र यावर सर्व बाजूंनी टिका झाल्याने राज्य सरकारने ही बंदी उठविली असून वृत्तपत्रांच्या घरोघरी वितरणावरील निर्बंध हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला.

जनतेसाठी राज्य सरकारने हे महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. मात्र मुंबई आणि पुणे महानगर प्रदेशात, तसेच कंटेनमेंट क्षेत्रात वितरणावरील बंधने कायम असतील असेही सांगण्यात आले आहेत. मुंबई आणि पुणे महानगर प्रदेश वगळून राज्याच्या उर्वरित भागात वर्तमानपत्र घरपोच वितरीत करण्यास परवानगी देताना सरकारने मास्क, सॅनिटायझर यांच्या वापरासंदर्भातील काही नियमही लागू केले आहेत. महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा; मुंबई, पुणे येथील नागरिकांना लॉकडाऊनच्या काळात मिळणाऱ्या सवलती रद्द

खबरदारी म्हणून वृत्तपत्रे वितरकांनी योग्य काळजी घेऊनच घरोघरी वृत्तपत्रे वितरित करायचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 5281 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 251 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर मुंबईत 3451 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 151 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी पाहता राज्यातील स्थिती खूपच चिंताजनक असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.