महाविकास आघाडीसमोर नवे संकट; Congress च्या महाराष्ट्रातील 25 आमदारांनी मागितली सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी वेळ
Congress President Sonia Gandhi (Photo Credits: ANI)

राष्ट्रीय पातळीवर अंतर्गत कलहाचा सामना करणाऱ्या काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या आमदारांमध्येही (Congress Maharashtra MLA) धुसफूस चालू आहे. पक्षाच्या राज्यातील 25 आमदारांनी सोनिया गांधींना (Sonia Gandhi) भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. त्यांच्या या अशा वृत्तीमुळे राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) सरकारसमोर नवीन संकट निर्माण झाले आहे. सरकारमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा समावेश आहे. याआधीही अनेकवेळा या तीनही पक्षातील मतभेद समोर आले आहेत.

आता इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीनुसार, महाराष्ट्र सरकारमधील आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांविरोधात तक्रार करण्यासाठी काँग्रेसच्या 25 आमदारांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. पक्षाचे मंत्री आपले ऐकत नाहीत, आपल्या समस्यांचे निराकरण करत नाहीत, असे या काँग्रेस आमदारांचे म्हणणे आहे. आमदारांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात त्यांना हस्तक्षेप करून गोष्टी सुरळीत करण्याचे आवाहन केले आहे.

काही आमदारांनी ईटीला सांगितले की, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, विशेषत: काँग्रेसचे मंत्री त्यांचे ऐकत नाहीत. त्यापैकी एक आमदार म्हणाले, ‘आपल्या मतदारसंघात योजना राबविण्याच्या आमदारांच्या विनंतीकडे मंत्र्यांनी दुर्लक्ष केले गेले. असे होत राहिले तर निवडणुकीत पक्षाची कामगिरी कशी होईल?’

पक्षात समन्वयाचा अभाव असल्याचे दर्शवत, आमदार म्हणाले की त्यांना गेल्या आठवड्यातच कळले की प्रत्येक काँग्रेस मंत्र्याला पक्षाच्या आमदारांशी संबंधित प्रश्न योग्य पद्धतीने सोडवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक मंत्र्याच्या अंतर्गत पक्षाचे तीन आमदार येतात. एमव्हीएने राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर काही महिन्यांतच हा निर्णय घेतला होता, मात्र सरकार स्थापनेनंतर अडीच वर्षांनी आम्हाला याची माहिती मिळत आहे. आमच्याशी नेमका कोणता मंत्री संबंधित आहे हे आजही आम्हाला माहीत नाही. (हेही वाचा: वरुण गांधी आणि संजय राऊत यांच्यात तीन तास चर्चा, राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधान)

याशिवाय काँग्रेस आमदारांचेही म्हणणे आहे की, राष्ट्रवादीचे नेते आणि उद्धव सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातत्याने आपल्या पक्षाच्या आमदारांना भेटतात, त्यांचे म्हणणे ऐकून घेतात आणि योजनांसाठी निधीची व्यवस्थाही करतात. राष्ट्रवादी काँग्रेस सतत काँग्रेसला टार्गेट करत असते. याबाबत आताच पावले उचलली नाहीत तर इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही काँग्रेस उपेक्षित होईल. पंजाबमध्ये पक्षाचा पराभव झाल्यानंतर आता महाराष्ट्राबाबत तातडीने काही य्प्ग्या निर्णय घ्यावा, असे आमदारांचे म्हणणे आहे.