Jayant Patil,Chandrakant Patil | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा सामना करत असताना भारतीय जनता पक्ष (BJP) मात्र राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही या आंदोलनाबत पत्रकाद्वारे कार्यकर्त्यांना आदेश दिला आहे. त्यामुळे कोरोना सारख्या संकटाचा सामना करण्याच्या नाजूक काळात आंदोलन करणे किती सयुक्तीक आहे यावर राज्यभरात चर्चा होत आहे. सोशल मीडियावरही भाजपच्या आंदोलनाच्या निर्णयाबाबत टीका होऊ लागली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपच्या या आंदोलनावर टीका करत खडेबोल सुनावले आहेत. तसेच, 'दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी!' असे म्हणत पाटील यांनी भाजपला टोलाही लगावला आहे.

जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या बोल्टसोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावे कार्यकर्त्यांना दिलेले आदेशपत्रही शेअर करण्यात आले आहे. हे पत्र शेअर करताना पाटील यांनी म्हटले आहे की, ''चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपा कार्यकर्त्यांना, आंदोलनात कोणते कपडे घालावेत, कोणत्या घोषणा द्याव्यात, बातम्या कशा पाठवाव्यात याचे आदेश देण्यापेक्षा 'महाराष्ट्रधर्म' पाळण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले असते, तर अधिक संयुक्तिक ठरले असते. दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी!''

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या पत्रात आंदोलनादरम्यान कोणत्या घोषणा द्यायच्या याबाबत सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे या घोषणा आणि आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले आहे. खास करुन 'उद्धवा अजब तुझे निष्फळ सरकार' ही घोषणा मुख्यत्वे द्या, असे आदेश चंद्रकात दादा पाटील यांनी दिले आहेत. या प्रमुख घोषणेसोबतच 'महाराष्ट्राची जनता मरणाच्या दारात, उद्धव सरकार मात्र आपल्या घरात', ठाकरे सरकार हाय हाय', 'उद्धव मात्र भाषण ठोकतो डरोना डरोना पण रोखता येईना तुला करोना करोना', 'हातात वाडगे-केंद्राकडे बोट, निर्णयात मात्र तुझ्याच खोट' अशा प्रकारच्या घोषणांची एक जंत्रीच चंद्रकात दादा पाटील यांनी आपल्या आदेशात दिली आहे. (हेही वाचा, Coronavirus: शरद पवार यांच्यावरील टीकेनंतर रोहित पवार यांचे देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर; आमदार मंगल प्रभात लोढा यांचीही ट्विटर वॉरमध्ये उडी)

जयंत पाटील ट्विट

दरम्यान, महाराष्ट्र संकटाचा सामना करत असताना आणि त्यातही कोरोना सारखे महाकाय संकट असताना अशा प्रकारचे आंदोलन करणे योग्य आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. चंद्रकांत दादा पाटील यांच्या या पत्रावरुनही जोरदार राजकारण तापले आहे.