शरद पवार (Sharad Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कुटुंबप्रमुख आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीत पार्थ पवार (Parth Pawar) यांच्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. ही बैठक पूर्वनियोजीत होती. पवार कुटुंबीयांमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद नाहीत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात सुरु असलेली बैठक संपली. सिल्वर ओक येथे ही बैठक पार पडली. या बैठकी वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. या बैठकीबाबत जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.
पार्थ पवार यांनी व्यक्त केलेल्या मतांबाबत शरद पवार यांनी आज तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवार हे असमंजस (इमॅच्युअर) आहेत. त्यांच्या मतांना आम्ही कवडीची किंमत देत नाही. अशा शब्दात शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र, आपले नातू पार्थ पवार यांना फटकारले आहे. शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांना आज दुपारी ही प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आज सायंकाळी लगेचच अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले. त्यामुळे राजीकीय वर्तुळ आणि प्रसारमाध्यमांमध्ये उत्सुकता होती. (हेही वाचा, पार्थ पवार केवळ निमित्त शरद पवार यांना राष्ट्रवादीतूनच आव्हान मिळते आहे काय?)
दरम्यान, बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असलेल्या जयंत पाटील यांना प्रसारमाध्यमांनी अनेकदा खोदून विचारले. मात्र, शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या बैठकीत पार्थ पवार यांच्याबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. शरद पवार हे आमचे कुटंब प्रमुख आहेत, असे सांगत राष्ट्रवादीत पवार यांचाच शब्द अंतिम असतो हे अप्रत्यक्षरित्या सांगीतले.