Ajit Pawar Real NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्याकडे, निवडणूक आयोगाचा निर्णय; शरद पवार यांना धक्का
| (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाचा (ECI) निर्णय झाला आहे. या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष हे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) यांना मिळाले आहे. आयोगाच्या निर्णय म्हणजे 85 वर्षांच्या शरद पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे. तसेच, हा गट 7 फेब्रुवारी दुपारी 4 वाजेपर्यंत स्वतंत्र पक्षासाठी निवडणूक आयोगाकडे मागणी करु शकतो. जर ही मागणी झाली नाही तर त्या गटाला अपक्ष मानले जाईल, असेही आयोगाने म्हटले आहे.

बहुमताच्या आधारे निर्णय

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबत आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, आयोगाने हा निर्णय बहुमताच्या आधारे घेतला. राष्ट्रीय पातळीवर विचार करता नागालँडमध्ये निवडणून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सात आमदारांनी अजित पवार यांनाच पाठिंबा दिला आहे. शिवाय पक्षातील बहुतांश आमदार खासदार यांचाही पाठिंबा अजित पवार यांनाच आहे. याकडे लक्ष वेधत शिवसेना पक्षाच्या बाबतीत जो निवाडा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत झाला, तसाच निवाडा या प्रकरणातही देण्यात आला. (हेही वाचा, Sharad Pawar On BJP: शरद पवार यांचे भाजपच्या दाव्याला वस्तुनिष्ठ उत्तर, म्हाणाले 'कशाच्या जोरावर येणार 450 जागा')

शरद पवार गटाकडे मर्यादित पर्याय

निवडणूक आयोगाने निर्णय देताना अजित पवार गटाला पक्ष आणि निवडणूक चिन्ह दिले आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाला स्वतंत्र गटाचा दर्जा दिला आहे. मात्र, हा दर्जा काही तासांकरिताच असणार आहे. कारण, या गटाला स्वतंत्र पक्ष म्हणून मान्यता हवी असल्यास उद्या म्हणजेच 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाकडे तशी रितसर मागणी करावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांना कोर्टातही दाद मागता येणार आहे. दरम्यान, उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र पक्ष म्हणून मान्यता मागितली नाही तर, या गटास अपक्ष मानले जाईल, असेही आयोगाने म्हटले आहे.  (हेही वाचा, Sharad Pawar on Ajit Pawar: 'तक्रार एकच आहे', शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबद्दल सांगितली मनातली गोष्ट)

शरद पवार हेच चिन्ह आणि पक्ष- जितेंद्र आव्हाड

केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. आमच्या पक्षाची राष्ट्रीय पक्ष ही मान्यता काढली तेव्हाच आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरुन केंद्र सरकार हे सर्व घडवून आणते आहे. हरकत नाही. आम्ही लढू. शरद पावर हाच आमचा चेहरा, पक्ष आणि चिन्ह आहे. त्यामुळे आम्ही जनतेत जाऊ. पण, एक आहे. ज्या व्यक्तीने झाड लावले, पक्ष नावाचे घर बांधले त्यालाच त्यातून बेदखल करणे. इतकेच नव्हे तर वयाच्या 85 व्या वर्षी त्यांना या यातना देणे हे प्रचंड वेदनादायी आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.