Sharad Pawar Press Conference: अजित पवार (Ajit Pawar) आणि काही सहकाऱ्यांबाबत चर्चा झाली. परंतू, त्यांनी घेतलेली भूमिका वेगळी होती. भाजपसोबत जायचं नाही ही आमची भूमिका होती. आम्ही मागीतलेली मतं ही भाजपसोबत जाण्यासाठी नव्हती. शिवसेना पक्षाबाबत आमची भूमिका वेगळी होती, स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली आहे. ते पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित पवार गटाचा एक मेळावा काल पार पडला. या मेळाव्यात झालेले आरोप, टीका आणि दावे यांबाबत शरद पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत उत्तर दिले. या वेळी त्यांनी काही गोष्टी मला प्रथम कळल्या. अजित पवार यांच्या बोलण्यात सत्यता नाही, असेही शरद पवार म्हणाले.
'तक्रार एकच आहे'
अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय तो त्यांचा अधिकार आहे. पण, तक्रार एकच आहे, त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर उमेदावारी अर्ज दाखल करताना करायला हवा होता. माझ्या (शरद पवार) मान्यतेने किंवा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सहीने त्यांनी जो उमेदवारी अर्ज दाखल केला. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावरचाच होता. जनतेने दिलेली मतं ही भाजपसोबत जाण्यासाठी दिली नव्हती, असा पुनरुच्चारही पवार यांनी केला. (हेही वाचा, Sharad Pawar on NCP Dispute: संघटना स्वच्छ झाली, निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल- शरद पवार)
ईडीने किती वेळा मुक्काम केला? प्रफुल्ल पटेल यांना सवाल
प्रफुल्ल पटेल एक पुस्तक लिहिणार आहेत, असे विचारले असता होय, आम्हीही ते ऐकतोय. मीसुद्धा त्या पुस्तकाची वाट पाहतो आहे, असे शरद पवार म्हणाले. पण, हे पुस्तक लिहिताना ईडीने त्यांच्या घरी किती वेळा मुक्काम केला होता. घराचे किती मजले ईडीने ताब्यात घेतले होते, याबाबतही एखादे प्रकरण (चॅप्टर) त्या पुस्तकात यावे. तसेच, लोक पक्ष का सोडतात याबाबतही पुस्तकात उल्लेख व्हावा, असेही शरद पवार यांनी मिष्कीलपणे सांगितले. (हेही वाचा, Pawar vs. Pawar: बारामती कोणाची? साहेबांची की दादांची? सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार 'सामना' रंगणार? )
अजित पवार यांची भूमिका पक्षाशी सुसंगत नाही
अजित पवार आणि त्याचे सहकारी आपल्याकडे आले होते. त्यांनी भाजपसोबत जाण्याचा विचार व्यक्त केला. परंतू आपण त्यांना सांगितले मी तुमच्यासोबत जाणार नाही. भाजपसोबत जाण्याची तुमची भूमिका आमच्याशी सुसंगत नाही. अखेर त्यांनी वेगळा निर्णय घेतला. त्यांनी केलेल्या मागण्यांवर चर्चा झाली होती. पण, तो निर्णय, भूमिका आपल्याला मान्य नसल्याचे आपण स्पष्टपणे सांगितल्याचे, असेही पवार म्हणाले.
राजीनामा देण्यासाठी कोणाला विचारण्याची गरज नाही
मी पक्षाचा अध्यक्ष होतो. मला वाटले म्हणून मी राजीनामा दिला होता. मला स्वत:च्या जबाबदारीवर घेतला होता. ती ताकद माझ्यात आहे. त्यासाठी मला कोणाला विचारण्याची गरज नाही. मात्र, तरीही काही लोक त्याला वेगळ्या शब्दात सांगायचा प्रयत्न करतात, असा टोला शरद पवार यांनी लागावला.
'हसन मुश्रीफ आपल्या घरी पाच तास बसले होते'
शरद पवार यांच्यासोबत अनिल देशमुख हे देखील पत्रकार परिषदेसउपस्थित होते. या वेळी त्यांनी स्वत:वर झालेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. भाजपसोबत चला म्हणून हसन मुश्रीफ आपल्या घरी पाच तास बसले होते. मात्र, ज्या लोकांनी मला त्रास दिला त्यांच्यासोबत जाणार नाही. शरद पवार यांची साथ सोडणार नाही, हे अनिल देशमुख यांनी या पत्रकार परिषदेत निक्षूण सांगितले.