Sharad Pawar on NCP Dispute: संघटना स्वच्छ झाली, निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल- शरद पवार
Sharad Pawar, Ajit Pawar | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

सत्ता येते सत्ता जाते. सामान्यांमध्ये राहणाऱ्यांना जनता नेहमीच साथ देते. जे घडलं त्याची चिंता करण्याची गरज नाही. उलट संघटना स्वच्छ झाली, असा थेट प्रहार करत शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्यावरील टीकेला संयतपणे प्रत्युत्तर दिले आहे. ते पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Sharad Pawar Faction) आयोजित बैठकीत बोलत होते. या वेळी त्यांनी आपण ज्यांना शक्ती दिली ते सोडून गेले. आपले काही लोक सोडून गेल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. पण, त्या हळूहळू दूर होत आहेत. तुम्हा सर्वांना नवी संधी मिळाली आहे. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे चेहरे विधानसभेत आणि लोकसभेत गेलेले पाहायला मिळतील, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

'सत्ता येते सत्ता जाते.. सामान्य लोकांचा पाठिंबा महत्त्वाचा'

लोकसभा निवडणुका तीन-ते चार महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे जोमाने तयारीला लागा. या पुढच्या प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवे चेहले पुढे आलेले दिसतील. तुम्ही ज्यांना शक्ती दिली. ते शक्तीशाली झाले आणि निघून गेले. त्यामुळे नव्याने संघटना उभारणीसाठी कामाला लागा. सत्ता येते सत्ता जाते. आपल्याला सामान्य लोकांचा पाठिंबा महत्त्वाचा. त्या दृष्टीने तयारीला लागा. विधानसभा निवडणुक जाहीर होईल, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नवी फळी निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करत लढाईला सज्ज राहण्याचे अवाहनच शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केले. (हेही वाचा, Pawar vs. Pawar: बारामती कोणाची? साहेबांची की दादांची? सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार 'सामना' रंगणार? )

'झोकून देऊन काम करण्याची तयारी ठेवा'

मित्रपक्षांसोबत जागावाटपासंदर्भात बोलणे सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार म्हणाले, अद्याप बोलणी सुरु आहेत. कोणते मतदारसंघ येतील कल्पना नाही. मात्र, जे मतदारसंघ आपल्या वाट्याला येतील त्यात झोकून देऊन काम करण्याची तयारी ठेवण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काग्रेस पक्षातील अजित पवार गटाची एक बैठक काल (2 डिसेंबर) पार पडली. या बैठकीत बोलताना अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या संबंध गटानेच शरद पवार यांच्या ध्येय-धोरणांवर जोरदार टीका केली होती. प्रफुल्ल पटेल यांनी तर सन 2004 मध्येच शरद पवार यांचा भाजप आणि शिवसेना पक्षासोबत जाण्याचा विचार होता, पण प्रमोद महाजन यांनी बाळासाहेब ठाकरे यांना या गोष्टीची कल्पना दिली आणि आपले महत्त्व दिल्लीत कमी होईल, असे सांगितले. त्यामुळे त्यावेळी युतीचा प्लान फसला. अजित पवार यांनीही आपला पक्ष (गट) बारामती, सातारा, शिरुर आणि रायगड या लोकसभा मतदारसंघावर उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर शरद पवार गटाची बैठक पुणे येथे पार पडली.