अजित पवार (Ajit Pawar) यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या नातलगांच्या घर आणि कंपनी, कार्यालयांवर आयकर विभागाने (Income Tax Department) छापे टाकले. हे छपासत्र बराच काळ सुरु आहे. या छापासत्रावरुन राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आणि आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि आता सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही या छापासत्राबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “मला माझ्या बहिणींच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. तीनही बहिणी खंबीर आहेत, त्या यातून बाहेर पडतील”, असे सुप्रिया सुळे यांनी आक्रमकपणे सांगितले आहे. तसेच, शिवछत्रपतींचे नाव घेणाऱ्या दिल्लीतील नेत्यांनी त्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष केले आहे. छत्रपतींनी कधीही महिलांना लक्ष्य केले नाही. मुघलांनी मात्र महिलांवर अत्याचार केले. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सुप्रिया सुळे बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'माझ्या बहिणींच्या ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी टाकल्याचे कळले तेव्हा मला मोठा धक्का बसला. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. केवळ कोणाचेतरी नातेवाईक आहेत म्हणून अशा प्रकारे जर कारवाई केली जात असेल तर हे फार धक्कादायक आहे. पण माझ्या तीनही बहिणी खंबीर आहेत. आम्हाला भीती वाटत नाही. मला माझ्या बहिणींच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. तीनही बहिणी खंबीर आहेत, त्या यातून बाहेर पडतील', असा पुनरुच्चार सुप्रिया सुळे यांनी केला. (हेही वाचा, IT Raids & Ajit Pawar: आयकर विभागाच्या छाप्यांबाबत शरद पवार यांची प्रतिक्रिया)
दरम्यान, शरद पवार यांनीही दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र कधीही झुकला नाही. कितीही धाडी टाकल्या तरी घाबरण्याचे कारण नाही. आम्ही आमची भूमिका सोडणार नाही, असे म्हटले आहे. उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांवर वाहने घालण्याची घटना घडली. या घटनेची तुलना आम्ही जालीयनवाला बाग हत्याकांडाशी केली. त्यामुळेच हे धाडसत्र सुरु आहे. अधिकारांचा अतिरेक किती करायचा हे आता लोकांच्याही लक्षात यायलालागले आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली. ते सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.