पुण्यातील विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर MPSC परीक्षा, निकाल, नियुक्त्या याबाबत रोहित पवार यांचं ट्विट
Rohit Pawar (Photo Credits: Facebook)

पुण्यातील (Pune) एका 24 वर्षीय एमपीएससीच्या (MPSC) विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा एमपीएससी परीक्षेचा मुद्दा चर्चिला जावू लागला आहे. कोविड-19 संकटामुळे रखडलेली परीक्षा परिणामी नोकरीला होणारी दिरंगाई आणि घरची आर्थिक परिस्थिती यातून आलेल्या नैराश्यातून स्वप्निलने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेचे सर्वत्र खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी देखील यासंदर्भात महत्त्वपूर्ण ट्विट केलं आहे.

ट्विटमध्ये त्यांनी एमपीएससीची स्थगित झालेली परीक्षा, प्रलंबित निकाल आणि नियुक्त्या याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंती सरकारला केली आहे. रोहित पवार ट्विटमध्ये लिहितात, "कोरोनामुळं स्थगित केलेली MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळं युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरित घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात." विशेष म्हणजे या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनाही टॅग केलं आहे.

रोहित पवार ट्विट:

समाजमाध्यमांशी बोलताना देखील त्यांनी सरकाला एमपीएससीच्या परीक्षा लवकरात लवकर घेण्याची विनंती केली. परीक्षेच्या ठिकाणी योग्य ती काळजी घेऊन तसंच विद्यार्थ्यांनाही काळजी घेण्यास सांगून लवकरात लवकर या परीक्षा घ्यायला हव्यात, असं मत त्यांनी व्यक्त केलं. तसंच रखडलेला निकालही लवकरात लवकर लावावा आणि नियुक्ताही कराव्यात. कारण आता वेळ घालवून चालणार नाही. यासाठी माझ्या इतर सर्व आमदार मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांसोबत चर्चा करत आहोत. मात्र आता केवळ चर्चा न करता याचा निकाल लागला पाहिजे, असंही ते म्हणाले. (Pune: नोकरी न मिळत असल्याने 24 वर्षीय MPSC विद्यार्थ्याची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये लिहिली 'ही' बाब)

दरम्यान, स्वप्निलची आत्महत्या ही सरकार पुरस्कृत हत्या असल्याचे भाजप आमदार राम सातपुते यांनी म्हटले आहे. तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नावर चर्चा करु, अशी ग्वाही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.