आमदार रोहित पवार यांचा चंद्रकांत पाटील यांना चिमटा, 'महाविकासआघाडीत घ्या, म्हणत शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं!'
Rohit Pawar, Chandrakant Patil | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या वक्तव्यावरुन राष्ट्रवदी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. 'सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता 5 वर्षात भाजपापासून सोशल डिस्टन्स ठेवत अनेक इच्छुक असले, तरी किमान मला एकट्याला तरी महाविकास आघाडीत घ्या,असं म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं!', असा टोला रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचं भाजपातील एक मोठे नेते म्हणाले. सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता 5 वर्षात भाजपापासून सोशल डिस्टन्स ठेवत अनेक इच्छुक असले, तरी किमान मला एकट्याला तरी महाविकास आघाडीत घ्या,असं म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं! आतातरी राजकारण थांबवा!',

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते की, राज्याच्या हितासाठी भाजपची शिवसेना पक्षासोबत जाण्याची तयारी आहे. मात्र, काही अटी असतील. भविष्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्वबळावर आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहायला हवे. त्यामुळे येत्या काळात भाजप कोणत्याही पक्षासोबत एकत्र निवडणूक लढणार नाही. फार फार तर निवडणुकीनंतर एकत्र येऊ शकेल. या सर्वांसाठी अद्याप 4 वर्षांचा काळ आहे. त्यामुळे आम्ही वेगवेगळेच लढू. त्यातूनही शिवसेनेकडून काही प्रस्ताव आला तर त्यावर केंद्रीय नेतृत्व विचार करेन, असे पाटील यांनी सांगितले. (हेही वाचा, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचे खंडण म्हणाले 'शिवसेना भजापमध्ये कोणताही प्रस्ताव नाही')

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. भाजप आणि शिवसेना एकत्र येणार नाहीत. दोन्ही पक्षांमध्ये तशी कोणतीही चर्चा नाही. तसेच, दोघांकडूनही एकमेकांना कोणताही तसा प्रस्तावही नाही. येणाऱ्या सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढणार आहे. चद्रकांत पाटील यांनी जे विधान केलेले ते केवळ एका प्रश्नाच्या उत्तरार्थ बोलत होते, असेही फडणवीस यांनी सांगितले.