देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचे खंडण म्हणाले 'शिवसेना भजापमध्ये कोणताही प्रस्ताव नाही'
Chandrakant Patil, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्याच्या हितासाठी शिवसेना (Shiv Sena) पक्षासोबत पुन्हा जाण्यास भाजप ( BJP) तयार आहे. मात्र, अटी लागू असतील, असे विधान करुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) , काँग्रेस (Congress) या सर्वच पक्षांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मात्र चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचे खंडण करत दोन्ही पक्षांमध्ये असा कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव अथवा चर्चा नाही असे म्हटले आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील हे एका प्रश्नाच्या उत्तरार्थ बोलत होते अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

चंद्रकांत पाटील यांच्या विधानाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये अशा कोणत्याही प्रकारची चर्चा नाही. अथवा प्रस्तावही नाही. येणाऱ्या सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून एकमेकांना कोणताही प्रस्ताव नाही. चद्रकांत पाटील यांनी जे विधान केलेले ते केवळ एका प्रश्नाच्या उत्तरार्थ बोलत होते, असेही फडणवीस यांनी सांगितले. (हेही वाचा, भविष्यात भाजप- शिवसेना एकत्र आली तरी, निवडणुका मात्र वेगवेगळ्या लढणार- चंद्रकांत पाटील)

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारणीची एक बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत झाली. या बैठकीची माहिती चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली. या वेळ बोलताना पाटील यांनी सांगितले की, भविष्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्वबळावर आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहायला हवे. त्यामुळे येत्या काळात भाजप कोणत्याही पक्षासोबत एकत्र निवडणूक लढणार नाही. फार फार तर निवडणुकीनंतर एकत्र येऊ शकेल. या सर्वांसाठी अद्याप 4 वर्षांचा काळ आहे. त्यामुळे आम्ही वेगवेगळेच लढू. त्यातूनही शिवसेनेकडून काही प्रस्ताव आला तर त्यावर केंद्रीय नेतृत्व विचार करेन, असे पाटील यांनी सांगितले.