Amol Mitkari: आमदार अमोल मिटकरी भाषण सुरु असताना कोसळले, व्यासपीठावरुन थेट रुग्णालयात दाखल
Amol Mitkari | (Photo Credits: Twitter)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांची प्रकृती व्यासपीठावर भाषण करत असताना अचानक बिघडली. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या बिफॉर्म कॉलेजमध्ये येथे सुरू होता. या वेळी मंचावरुन बोलत असताना मिटकरी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि मंचावरच त्यांचा काहीसा तोल गेला. दरम्यान, कार्यकर्त्यांनी त्यांना सावरले आणि तातडीने रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना भाषण करताना अर्धांगवायूचा झटका आल्याची चर्चा समाजमाध्यमातून सुरु झाली. मात्र, आपली प्रकृती ठणठणीत असून मला अर्धांगवायूचा झटका वैगेरे काही आले नाही, अशी माहिती मिटकरी यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

काय घडले नेमके?

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे अतिशय निकटवर्तीय समजले जाणारे अमोल मिटकरी. स्टेजवरुन भाषण करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या साहित्य कला चित्रपट विभागाच्या अध्यक्ष वैशाली माडे यांच्या सत्काराचा हा कार्यक्रम पक्षाने आयोजित केला होत. या कार्यक्रमास पक्षाचे इतरही नेते उपस्थित होते. कार्यक्रमात बोलत असताना अमोल मिटकरी यांना अत्यंत अस्वस्थ वाटू लागले. कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना त्यांचे भाषण रंगात आले होते. आपल्या भाषणात ते ‘माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या मनाची होतीया काहीली’ ही लावणी गात होते. दरम्यान अचानक ते व्यासपीठावरच कोसळले. व्यासपीठावर कोसळल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये मिठकरी यांना अर्धांगवायूचा झटका आल्याची चर्चा सुरु झाली. परंतू, रुग्णालयात उपचार घेऊन ठिकठाक झाल्यावर अमोल मिठकरी यांनी लागलीच ट्विट केले आणि आपली प्रकृती ठिक असल्याचे सांगितले. (हेही वाचा, Maharashtra Legislative Council Election 2020: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे यांची राजकीय कारकीर्द)

अमोल मिटकरी ट्विट

अमोल मिठकरी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, ''आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादामुळे मी एकदम ठणठणीत असून सोशल मीडियामधून येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. मला कुठलाही अर्धांगवायूचा झटका वगैरे आला नाही. माझी प्रकृती उत्तम असून सध्या अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.लवकरच जनसेवेत रुजू होईल.''