राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीचे अधिकारी कार्यालयात घेऊन गेले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी पहाटे पाच वाजताच मलिक यांच्या घरी हजेरी लावली. त्यानंर सकाळी सात वाजता ईडी अधिकारी मलिक यांना घेऊन कार्यालयात गेले. त्यानंतर महाविकासआघाडीमधील घटक पक्षांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे की, 'असे काही होणार हे आम्हाला वाटत होते. त्यामुळे असे घडल्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटत नाही.' शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही संतप्त प्रतिक्रिया देत 'जे सत्याची बाजू घेतात. खोट्याचा बुरखा फाडतात त्यांच्याविरोधातच केंद्रीय यंत्रणा दबावाखाली काम करत असतात'. दरम्यान, या प्रकरणावर शरद पवार, संजय राऊत, सुप्रिया सुळे (Supriya Sule), जयंत पाटील यांच्यासह अनेकांनी दिली प्रतिक्रिया दिली आहे.
आम्हाला आश्चर्य वाटत नाही- शरद पवार
नवाब मलिक आम्हाला खात्री होती की, आज नाही तर उद्या हे कधीतरी घडेल. अखेर ते घडले. त्यामुळे आम्हाला यात आश्चर्य वाटत नाही. पंचवीस वर्षांपूर्वी मुख्यमंत्री होतो तेव्हा माझ्यावरही आरोप झाले होते. काही लोक आरोप करण्याचे काम करतात. पुढे चौकशीत काहीच निघत नाही. नवाब मलिक यांच्याबाबतही असेच घडेल. एखादा कार्यकर्ता मुस्लिम असला की त्याचे नाव दाऊदशी जोडले जाते असेही पवार म्हणाले. (हेही वाचा, Sanjay Raut on & BJP: 2024 नंतर ते आहेत आणि आम्ही आहोत, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा भाजप, ईडीला इशारा)
2024 नंतर मात्र आम्ही आहोत आणि ते आहेत- संजय राऊत
भाजप आणि केंद्रातील महात्म्यांच्या आधारे ईडी, सीबीआय आणि इतर काही केंद्रीय तपास यंत्रणांच्या ज्या धाडी पडत आहेत ते आम्ही समजू शकतो. महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ मंत्री असलेल्या नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी कार्यालयात बोलावले. कॅबिनेट मंत्र्याला ईडीचे लोक घरी येऊन घेऊन जातात. हे योग्य नाही. पण आम्हाला माहिती आहे हे 2024 पर्यंत चालेल. 2024 नंतर मात्र आम्ही आहोत आणि ते आहेत, असा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि ईडीसह केंद्रीय तपास यंत्रणांना दिला आहे.
पक्ष बदलल्या नंतर ती नोटीस विरघळून जाते- सुप्रिया सुळे
पाठिमागील अनेक महिन्यांपासून अनेक लोक ट्विटरच्या मागे लपून अटक होणार, असे सातत्याने सांगत होते. त्यामुळे नवाब मलिक यांच्याबातब जे घडले त्याबाबत आम्हाला आश्चर्य वाटत नाही. आम्ही आमची लढाई कायद्याच्या आणि सनदशीर मार्गाने लढू. फक्त प्रश्न इतकाच आहे की, विरोधात असताना ईडीच्या नोटीस येतात आणि पक्ष बदलल्या नंतर ती नोटीस विरघळून जाते,” असे का?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.
सत्तेच्या दुरुपयोगाचा आणखी एक प्रकार- जयंत पाटील
नवाब मलिक यांच्यावरील कारवाई म्हणजे सत्तेच्या दुरुपयोगाचा आणखी एक प्रकार असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. राज्यातील एका मंत्र्याला कोणतीही पूर्व नोटीस न देता घेऊन जाणे म्हणजे घटनेचीच नव्हे तर सर्वच गोष्टींची पायमल्ली आहे. हे वर्तन देशातील संघराज्य व्यवस्थेच्या विरोधातील आहे, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.