Fake South Korean Visa Racket: बनावट दक्षिण कोरियाचा व्हिसा रॅकेट चालवल्याप्रकरणी नौदलाच्या अधिकाऱ्याला अटक
Arrest | (Representative Image)

Fake South Korean Visa Racket: एका मोठ्या कारवाईत मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) नौदल अधिकाऱ्याला (Naval Officers) बनावट दक्षिण कोरिया (South Korean) चा व्हिसा रॅकेट (Visa Racket) चालवल्याप्रकरणी अटक (Arrest) केली आहे. अटक केलेल्या अधिकाऱ्यावर बनावट कागदपत्रांवर लोकांना परदेशात पाठवल्याचा आरोप आहे. त्यासाठी या अधिकाऱ्याने लाखो रुपयेही घेतले होते. मुंबई पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले की, लेफ्टनंट कमांडर विपिन कुमार डागर (वय 28) याला गुरुवारी गुन्हे शाखेने कुलाबा येथे पकडले.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, तो बनावट कागदपत्रांचा वापर करून लोकांना दक्षिण कोरियाला पाठवणाऱ्या नेटवर्कचा भाग असल्याचे तपासात उघडकीस आले. डागर नेटवर्कला मदत करण्यासाठी आपल्या अधिकृत पदाचा गैरवापर करत असे. डागर यांच्या अनेक साथीदारांनी 8 ते 10 जणांना दक्षिण कोरियात पाठवल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून प्रतिव्यक्ती 10 लाख रुपये आकारले आहेत. डागर हा मूळचा हरियाणाचा रहिवासी असून तो एका हवाई दलातील अधिकाऱ्याचा मुलगा आहे. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला 5 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. (हेही वाचा -Ladakh Tragedy: लडाखमध्ये टँक सराव करताना मोठी दुर्घटना; नदी ओलांडताना पाण्याची पातळी वाढली, लष्कराच्या 5 जवानांचा मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, बनावट कागदपत्रांवर लोकांना परदेशात पाठवणाऱ्या रॅकेटमध्ये नौदलाचा एक अधिकारी सहभागी असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली होती. व्हिसा अर्ज जलद करण्यासाठी संबंधित अधिकारी त्याच्या गणवेशात दक्षिण कोरियाच्या दूतावासात जाऊ शकतो असे पोलिसांना कळले होते. या रॅकेटमध्ये सामील असलेल्या लोकांनी दक्षिण कोरियामध्ये कामाच्या संधीचे आश्वासन दिले आणि व्हिसाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी बनावट कागदपत्रे दिली. दक्षिण कोरियात पोहोचल्यावर हे लोक व्हिसा फाडून आश्रय मागायचे आणि नंतर नागरिकत्व मागायचे.

प्रत्येक व्यक्तीकडून 10 लाख रुपयांची वसुली -

या रॅकेटशी संबंधित अधिकाऱ्याची मुंबई क्राइमने चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या अधिकाऱ्याने 8 ते 10 जणांना दक्षिण कोरियात प्रवासाची सुविधा दिल्याचे मान्य केले आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी प्रत्येक व्यक्तीकडून 10 लाख रुपये आकारत असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले आहे. दरम्यान, डागर हा सुमारे 6 वर्षांपूर्वी भारतीय नौदलात दाखल झाला होता आणि गेल्या वर्षभरापासून तो वेस्टर्न नेव्हल कमांडमध्ये होता. विविध अहवालांनुसार, डागर यांनी INS केरळमधून यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये BE पदवी प्राप्त केली आहे.