Navi Mumbai Metro (संग्रहित संपादित प्रतिमा)

मुंबई (Mumbai) शहराच्या वाहतुकीच्या जाळ्यातील एक महत्त्वाचा टप्पा गाठत, अनेक वर्षांपासून अपेक्षित असलेली नवी मुंबई मेट्रो सेवा (Navi Mumbai Metro) सुरू झाली आहे. बेलापूर ते पेंढार दरम्यान सेवा देणार्‍या मेट्रोद्वारे रहिवाशांना स्वस्त आणि आनंददायी वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. यामुळे प्रवाशांमध्ये प्रवासाबाबत मोठा उत्साह दिसून येत आहे. गेल्या पाच दिवसांत 68,000 हून अधिक प्रवाशांनी नव्याने सुरू झालेल्या नवी मुंबई मेट्रोचा स्वीकार केला आहे, ज्यामुळे या भागातील वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.

पूर्वी ऑटो-रिक्षा, इको-व्हॅन्स आणि नवी मुंबई म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट (NMMT) द्वारे चालवल्या जाणार्‍या बसेसवर अवलंबून असलेले रहिवासी आता मेट्रोने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. वाहतूक कोंडीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या उत्सव चौक ते तळोजा या मार्गावरील वाहतूक बरीच कमी झाल्याचा अहवाल वाहतूक विभागाने दिला आहे. सायन-पनवेल महामार्गालगत असलेल्या हिरानंदानी चौकात याचा प्रभाव दिसून येत आहे.

सिडकोच्या आकडेवारीनुसार, पहिल्या पाच दिवसांत अंदाजे 68,000 प्रवाशांनी मेट्रोची निवड केली असून, सुट्टीच्या काळात सरासरी 15,000 लोकांनी या वाहतुकीचा पर्याय निवडला आहे. आरबीआय स्टेशन वगळता बहुतेक स्थानकांवर दररोज 500 हून अधिक प्रवाशांची वर्दळ होती. दुसरीकडे काही लोकांनी मेट्रोचे भाडे बसच्या तुलनेत किंचित जास्त असल्याचे मत व्यक्त केले आहे. बेलापूर ते पेंढार या मेट्रो प्रवासासाठी 40 रुपये तिकीट आहे. त्याच मार्गावरील एसी बसेससाठी 27 रुपये आणि नॉन-एसी बससाठी 21 रुपये आकारले जातात. (हेही वाचा: Mumbai Block: मुंबईमध्ये 27 नोव्हेंबरपासून 20 दिवसांचा ब्लॉक जाहीर; गोखले उड्डाणपुलाच्या गर्डर उभारणीसाठी Western Railway चा मोठा निर्णय)

वाहतूक विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रवासी मोठ्या प्रमाणावर मेट्रोकडे स्थलांतरित होत आहेत. मात्र अजूनही मेट्रोच्या दरामुळे अनेक लोक बससेवा वापरत आहेत. नवी मुंबई मेट्रोच्या पहिल्या मार्गिके- पेंढार ते बेलापूर मार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर आता प्रवासी प्रस्तावित मेट्रो मार्ग 2, 3 आणि 4 च्या भवितव्याचा विचार करत आहेत.