Mumbai Block: मुंबईमध्ये 27 नोव्हेंबरपासून 20 दिवसांचा ब्लॉक जाहीर; गोखले उड्डाणपुलाच्या गर्डर उभारणीसाठी Western Railway चा मोठा निर्णय
Mumbai Local | ( Photo Credits: Pixabay.com)

मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेने (Western Railway) 27 नोव्हेंबरपासून 20 दिवसांच्या ब्लॉकचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामुळे काही रेल्वे सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्या आहेत. अंधेरी येथील एसव्ही रोड आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे यांना जोडणाऱ्या बांधकामाधीन गोखले पुलाच्या गर्डर बसवण्याच्या कामामुळे हा ब्लॉक जाहीर केला गेला आहे. माहितीनुसार, हा ब्लॉक मुख्यत्वे रात्रीच्या काळात असणार आहे. रोज सरासरी 3-4 तास ब्लॉक असणार आहे. रेल्वेकडून येत्या काही दिवसात ब्लॉकचे वेळापत्रक जाहीर केले जाईल.

ऑक्टोबरमध्ये उत्तर कॅरेजवे गर्डर बसवल्यानंतर आता लक्ष दक्षिण कॅरेजवे गर्डर लाँच करण्याकडे वळले आहे. प्रभावी 90 मीटर पसरलेला, हा गर्डर शहरातील दुसऱ्या क्रमांकाचा रेल्वे पूल गर्डर बनेल. याच्या असेंब्ली, पुशिंग आणि लॉन्चिंग प्रक्रिया 25 मीटर उंचीवर होतील.

अंदाजे 1,300 टन वजनाचा प्रत्येक गर्डर खास डिझाईन केलेल्या क्रेनचा वापर करून उचलला जाईल. सध्या 1975 मध्ये बांधण्यात आलेल्या गोखले पुलाचे 90 कोटी रुपये खर्चून सर्वसमावेशक पुनर्बांधणी सुरू आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने नोव्हेंबर 2023 ची प्रारंभिक मुदत पूर्ण करण्यास विलंब केल्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये पूल अंशतः खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. बॉम्बे आयआयटीच्या अहवालात संरचनेची संपूर्ण पुनर्बांधणी सुचविल्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये हा पूल बंद करण्यात आला. त्यानंतर पश्चिम रेल्वेने डिसेंबर 2022 मध्ये पूल पाडण्याचे काम सुरू केले व हे काम चार महिन्यांत पूर्ण झाले.

याआधी जुलै 2018 मध्ये गोखले पुलावर मोठी दुर्घटना घडली होती. कोसळलेल्या पुलाचा एक भाग गंज आणि ओव्हरलोडमुळे तुटलेला आढळून आला होता, ज्यामध्ये अतिरिक्त भार 44.4 टक्क्यांपेक्षा जास्त होता. त्यानंतर आता याची पुनर्बांधणी सुरु आहे. गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्या उद्घाटनास अनेकवेळा विलंब होत असल्याचे सांगत स्थानिक नागरिकांनी याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. (हेही वाचा: Delisle Road Bridge Opening: डिलाईल रोड पुलाचे उद्या उद्धाटन होण्याची शक्यता, दक्षिण मुंबईतील नागरिकांना मिळणार दिलासा)

लोखंडवाला ओशिवरा सिटिझन्स असोसिएशनचे अध्यक्ष धवल शाह म्हणाले, ‘जेव्हा हा पूल बंद करण्यात आला, त्या वेळी आम्ही भारतीय लष्कराच्या मदतीने तो बांधण्याची विनंती केली होती, ज्यांनी विक्रमी वेळेत परळमध्ये फूट ओव्हर ब्रिज बांधला होता. गोखले पुलाच्या उद्घाटनाची मुदत चौथ्यांदा वाढल्याने, आता आम्हाला शंका आहे की नवीन मुदत देखील वाढवली जाईल, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशी आमची इच्छा आहे.’